![]()
लोहार यूथ फाउंडेशन, अहिल्यानगरतर्फे व समस्त लोहार समाजाच्या सहभागातून ‘विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१६ ऑगस्ट) राहुरी येथील शिवचिदंबर मंगल कार्यालय, बारागाव नांदूर रोड येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थी आणि समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक, तथा लोहार यूथ फाउंडेशनचे अमोल जवणे यांनी केले. अमोल जवणे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक झाल्यास त्यांना भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. तसेच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. या सोहळ्यात शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, राजकारण तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ पोपळघट, कृषिकर सहाय्यक गिरिजा पोपळघट, नाशिक मनपाच्या सभापती मंगलताई नन्नवरे, नायब तहसीलदार राजेंद्र लाड, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांताराम लोखंडे, राज्य सचिव रघुनाथ लाड, मुंबईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पोपळघट आदी उपस्थित राहणार आहेत. आपल्या पाल्याच्या यशाला कौतुकाची थाप देण्यासाठी आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव अनुभवण्यासाठी समाजबांधवांनी उपस्थित राहावे,” असे आवाहन अमोल जवणे यांनी केले आहे.
Source link
यश मिळवणाऱ्या गुणवंतांना टाळ्यांनी सलाम करूया : जवणे:लोहार समाज गुणवंतांचाउद्या राहुरीत सन्मान सोहळा