Headlines

विहिरीत पडून मायलेकीचा अंत:वांगी नं. 1 येथील घटना




करमाळा तालुक्यातील वांगी नं. १ येथे घराजवळील विहिरीत पडून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार दि. १४ रोजी दुपारी उघडकीस आली आहे. चिमुकली मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी आईनेही विहिरीत उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, दोघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये शिल्पा सागर जाधव (वय २८) आणि ऋता सागर जाधव (वय २) यांचा समावेश असून ही घटना वांगी नं. १ येथील लोकविकास डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जाधव वस्ती येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, ऋता खेळत असताना घराजवळील विहिरीत पडली असावी. तिला वाचवण्यासाठी शिल्पा यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, शिल्पा यांना पोहता येत नसल्याने दोघीही पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू होती. या घटनेमुळे वांगी नं. १ गावावर शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *