![]()
ग्रुप ग्रामपंचायत सावंगी-लासूर स्टेशनच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासक मीनाताई संजय पांडव, ग्रामपंचायत अधिकारी डी. एन. जाधव व प्रशासकीय समितीच्या पुढाकाराने निघालेल्या या रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत गंगापूर पंचायत समितीच्या सभापती कविताताई चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या संगीताताई आमराव, पंचायत समिती सदस्य सुनील पाखरे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये लासूर स्टेशन परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, बचत गटांच्या महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात राष्ट्रध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासक मीनाताई पांडव यांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासन, शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्याने देशभक्तीच्या उत्साही वातावरणात रॅलीची यशस्वी सांगता झाली.
Source link
लासूर स्टेशन येथे तिरंगा रॅली:‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला