![]()
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून, दत्तधाम सरकार नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संगमनेर पोलिसांनी ही कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गजाआड केले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडगावपान परिसरात राजेंद्र बापू गडगे हा स्वतःला दैवी शक्ती लाभलेला असल्याचे भासवत होता. त्याने दत्तधाम सरकार या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोच निर्माण केली होती. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवर मंत्रशक्तीने उपचार करतो, निःसंतान महिलांना मूलप्राप्ती करून देतो आणि घरातील अडचणी दूर करतो, असे भ्रामक दावे करून तो लोकांना आकर्षित करत होता. या आमिषाला भुलून अनेक नागरिक त्याच्या दरबारात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, गडगे हा आपल्या तथाकथित उपचारांसाठी मोठ्या रकमेची मागणी करत असे. 15 हजार, 21 हजार ते अगदी 51 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतल्याचे समोर आले आहे. उपचाराच्या नावाखाली तो रुग्णांना साधे वनस्पतीजन्य पदार्थ देत असे, ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होत होता. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्याने शेकडो लोकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीमुळे झाला. समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी कारवाई करत राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकून राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आरोपींवर विविध कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट व्हिडिओ तयार करून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींच्या जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे याचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती लोक फसले आहेत, याचाही तपास सुरू आहे. या कारवाईमुळे भोंदूगिरीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Source link
संगमनेरमध्ये दत्तधाम सरकारचा भंडाफोड! मंत्रशक्तीच्या नावाखाली लाखोंची लूट:अंनिसच्या तक्रारीनंतर राजेंद्र गडगेवर कारवाई