![]()
तुळजापूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर प्रश्न उपस्थित करताना केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील यांच्यावर ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग असल्याचा मिश्किल टोला लगावला. सरनाईक यांच्या या वक्तव्यावर आता कैलास पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयाला राजकीय टिंगल-टवाळीचे स्वरूप देणे योग्य नाही, अशी नाराजी पाटील यांनी व्यक्त केली. तसेच आपल्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवण्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरही त्यांनी उपरोधिक भाषेत प्रत्युत्तर दिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून सुरू झाला वाद तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, या कॅमेऱ्यांच्या वापराबाबत कैलास पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच हे कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नसल्याचेही कैलास पाटील यांनी म्हटले आहे. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने याबाबत अधिक गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. कैलास पाटील म्हणाले की, या प्रकरणाची स्पष्टता देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची, विशेषतः गृह विभागाची होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस स्पष्टता समोर आलेली नाही. मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन केले जात असल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग कैलास पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मिश्किल टिप्पणी केली. ‘कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहेत,’ असा दावा सरनाईक यांनी केला. यापुढे जात त्यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कैलास पाटील यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असा टोला लगावला. कैलास पाटील कुठे जातात, किती वाजता घरी जातात आणि तुळजापूरला कधी येतात, याची माहिती या कॅमेऱ्यांमधून मिळणार असल्याचे सरनाईक यांनी म्हटले. त्यामुळे आपले ‘ऑपरेशन टायगर’ आणखी सोपे होईल, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. CCTVच्या मुद्द्याला वेगळं वळण देऊ नका सरनाईक यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना कैलास पाटील यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली जात असल्याचा आरोप केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसारखा गंभीर विषय समोर असताना त्यावर ठोस उत्तर देण्याऐवजी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा करून विषयाला वेगळे वळण दिले जात असल्याचे पाटील यांनी म्हटले. ‘सीसीटीव्हीच्या बाबतीत चायनीज-जपानीज असं बोलणं पालकमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हतं,’ अशी टीकाही त्यांनी केली. तुळजाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेबाबत कोणतीही शंका निर्माण झाल्यास त्याची योग्य पद्धतीने चौकशी आणि स्पष्टता होणे आवश्यक आहे, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी मागे लावा आपल्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याच्या सरनाईकांच्या वक्तव्यावर कैलास पाटील यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. ‘माझ्यावर पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा,’ असे आव्हानच त्यांनी दिले. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद आता थेट ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय चर्चेपर्यंत पोहोचला आहे. कैलास पाटील आणि ‘ऑपरेशन टायगर’चा संदर्भ काय? 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह बंड करत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठली होती. त्यावेळी कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे आमदार सुरतला पोहोचण्यापूर्वीच माघारी परतले होते. त्यामुळे दोन्ही आमदारांच्या भूमिकेची आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या निष्ठेची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीत कैलास पाटील पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांचे मित्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आता प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील यांचा ‘ऑपरेशन टायगर’शी संबंध जोडल्याने धाराशिवच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, कैलास पाटील यांनी या राजकीय चर्चांपेक्षा तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विश्वासार्हतेचा मूळ प्रश्न महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री प्रताप सरनाईक या आरोपांवर नेमकी काय भूमिका मांडतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत संबंधित विभागाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… ध्वजारोहणातील आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हेंची नाराजी!:म्हणाल्या- महापौरांना बसायला धड खुर्ची नाही, आमदारांनाही डावलले; प्रशासनावर टीकास्त्र स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमातील आसन व्यवस्थेवरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींच्या आसन व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून योग्य नियोजन झाले नसल्याचे त्यांनी म्हटले. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत बसलेल्या असताना लोकप्रतिनिधींसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने हा मुद्दा चर्चेत आला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
‘ऑपरेशन टायगर’वरून कैलास पाटलांचा पलटवार:सरनाईकांना आव्हान, म्हणाले- पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा