![]()
वेल्हे पोलिसांनी घेवडे गावात फार्महाऊसच्या बांधकामासाठी ठेवलेले साहित्य चोरल्याप्रकरणी एका सराईत चोरट्यास अटक केली आहे. रमेश बबन मरगळे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही घटना ९ जून २०२६ रोजी घडली होती. घेवडे गावच्या हद्दीत ॲड. सूरज ननवरे यांच्या फार्महाऊसचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी बांधकामासाठी आणलेल्या सुमारे ८८ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरून नेले होते. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात घरफोडीसह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. पोलीस हवालदार गजानन खत्री यांना चोरटे पुन्हा चोरीच्या उद्देशाने घेवडे गावात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गावात गस्त वाढवली. गस्तीदरम्यान, नागरिक सागर देवेंगिरीकर, सरजुल असारी, दिनानाथ प्रसाद, रामभाऊ जनकर आणि अनिकेत गायकवाड यांनी फार्महाऊसजवळ संशयास्पदरीत्या दोन-तीन वेळा फिरणारा एक पिकअप टेम्पो पाहिला. पोलिसांनी टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन वेल्हेच्या दिशेने पळवले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो अडवला. वाहनातील दोन जण डोंगरातील झाडाझुडपांतून पसार झाले, मात्र चालक रमेश मरगळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
सराईत चोरट्यास अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त:घेवडे येथील फार्महाऊस चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई