Headlines

शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासनाचा पुढाकार:छत्रीतलाव आणि वडाळी उद्यानांच्या सौंदर्यीकरणावर भर; स्वच्छतेसाठी जनसहभागाचे आवाहन‎




शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर नगर येथील झोन क्रमांक ३ मधील कचरा संकलन केंद्राची पाहणी करून संपूर्ण केंद्र स्वच्छ, सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कचरा संकलन केंद्रे सुस्थितीत ठेवण्याला महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून नाल्यांची नियमित साफसफाई करण्यावर महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस नगर परिसरातील नाल्यांच्या पाहणीदरम्यान नाल्यात हॉकर्स व काही नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावर कठोर भूमिका घेत नाल्यात कचरा टाकला जाणार नाही. नाल्याची नियमित साफसफाई केली जावी. असे निर्देश देण्यात आले. यावेळी नाल्यांमध्ये गाळ साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ऑक्सिजन पार्क परिसरात पाहणीवेळी रस्त्याच्या कडेला असलेले बांधकाम साहित्य हटवण्याबाबत नागरिकांना व व्यावसायिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले. विशेषत: ऑक्सिजन पार्कसारख्या सार्वजनिक ठिकाणी साहित्याची साठवणूक टाळावी. शहराच्या सौंदर्यीकरणात सर्वांनी हातभार लावावा. अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. शहराचा विकास हा केवळ प्रशासकीय प्रयत्नांनी नव्हे. तो लोकसहभागातून अधिक प्रभावी होतो. असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. नागरिकांनी आपला घरगुती कचरा घंटागाडीतच द्यावा. सार्वजनिक स्वच्छता राखावी. महानगरपालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले. अमरावतीला एक आदर्श शहर बनवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सकारात्मक पाऊल ऐतिहासिक छत्रीतलाव परिसराला भेट देऊन त्याचा विकास करून त्याला पर्यटनस्थळाचे स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वडाळी उद्यानाला भेट देऊन त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. असे आयुक्त म्हणाल्या. या प्रकल्पांना गती देऊन शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. तसेच उद्यानांची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *