![]()
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील अस्वच्छता आणि प्रवाशांच्या सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकाची पाहणी केली. सार्वजनिक प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेथे अस्वच्छता, अपुरी देखभाल आणि कर्मचाऱ्यांचा अभाव होता. यासंदर्भात प्रवाशांकडूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी बाह्य संस्थांची नियुक्ती करण्यात आली असली तरी, त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेणे आणि त्यावर सातत्याने देखरेख ठेवणे ही स्थानिक अधिकारी व प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, या मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “बाह्य संस्थेला काम दिले म्हणून अधिकाऱ्यांची जबाबदारी संपत नाही. प्रवाशांना प्रत्यक्षात स्वच्छता आणि आवश्यक सुविधा मिळत आहेत की नाही, याची नियमित पाहणी करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत उदासीनता अजिबात सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या संस्थांकडून योग्य प्रकारे काम करून न घेणाऱ्या तसेच देखरेखीत कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांना स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांशी थेट संवाद साधला. प्रवाशांच्या अडचणी, तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याबाबत माहिती घेतली. प्रवाशांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बसस्थानकावरील प्रसाधनगृहातील अस्वच्छता, कामात हलगर्जीपणा आणि प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात दाखवलेली उदासीनता याबद्दल विभाग नियंत्रक आणि संबंधित आगार व्यवस्थापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत. या संदर्भात पुढील सात दिवसांत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
Source link
सिडको बसस्थानकातील अस्वच्छतेवर मंत्री प्रताप सरनाईक संतापले:प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश