![]()
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. दहीहंडीचा समावेश ‘युनेस्को’ च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, मानवी मनोऱ्यांचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यातील निवडक गोविंदा पथकांना स्पेनच्या दौऱ्यावर पाठवले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल संघ सभागृहात ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’च्या वतीने आयोजित ‘कृष्णानंद सोहळ्यात’ ते बोलत होते. “पर्यावरण आणि सुरक्षेची खबरदारी घेणे आवश्यक आहेच. मात्र उत्सवांवर सातत्याने नवीन मर्यादा आणून ते अखेर बंदीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांचा शहरी नक्षलवादाशी संबंध आहे का, असा थेट संशय येतो, असेही ते या वेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातील लढाईने दिला दिलासा दहीहंडीवरील न्यायालयीन संकटांचा उल्लेख करताना शेलार म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे आणि सरकारने न्यायालयात मांडलेल्या भक्कम बाजूमुळेच गोविंदा पथकांना मोठा दिलासा मिळाला.’ या कायदेशीर विजयाचे भान ठेवून यंदाही पथकांनी शिस्त, रहदारीचे नियम आणि मानवी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. दिव्य मराठी नॉलेज: वारसा यादीत स्थान मिळण्याची ५-टप्प्यांची प्रक्रिया पहिला टप्पा : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग दहीहंडीचा इतिहास, सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व, सुरक्षिततेचे निकष आणि पथकांचा सहभाग दर्शवणारे व्हिडिओ पुरावे तयार करेल. दुसरा टप्पा : युनेस्कोच्या निकषांनुसार आंतरराष्ट्रीय नामांकनापूर्वी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘संगीत नाटक अकादमी’मार्फत दहीहंडीची भारताच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा सूचीत अधिकृत नोंद केली जाईल. तिसरा टप्पा: केंद्र प्रस्तावांची अंतिम छाननी करून परराष्ट्र मंत्रालय आणि पॅरिसमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधींमार्फत दहीहंडीचा अधिकृत प्रस्ताव युनेस्को मुख्यालयाकडे सादर करेल. चौथा टप्पा : युनेस्कोची मूल्यांकन समिती परंपरेचे स्वरूप, समाजाची/गोविंदा पथकांची लेखी सहमती, संरक्षणाची ठोस योजना आणि राष्ट्रीय नोंद या ५ अनिवार्य निकषांवर प्रस्तावाची तपासणी. पाचवा टप्पा : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या वार्षिक अधिवेशनात जागतिक प्रतिनिधींच्या मान्यतेनंतर दहीहंडीचा समावेश “जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत’ अधिकृतपणे घोषित केला जाईल.
Source link
गोविंदा पथकांना स्पेन दौऱ्यावर पाठवणार : आशिष शेलार:दहीहंडीला युनेस्कोचे मानांकन मिळवून देऊ , मुंबईत ‘कृष्णानंद सोहळ्यात’ केले आवाहन