Headlines

निवडणूक झाली, नगरसेवक झाले; आता 6 महिन्यांनी पात्रतेची परीक्षा:3 अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींवर आता सुनावणी




महापालिका निवडणूक झाली, उमेदवार निवडून आले, नगरसेवक झाले; मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २७ नगरसेवकांविरोधात ३७ नोटिसा बजावण्यात आल्या असून तीन अपत्ये, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणांवर टप्प्याटप्प्याने सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची पात्रता तपासली गेल्यानंतर निवडून आल्यानंतरच या तक्रारींची चौकशी का करावी लागली, हा प्रश्न या प्रकरणामुळे पुढे आला आहे. महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१)(ड) अन्वये ही नोटीस प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तक्रारी आल्यानंतर जन्म-मृत्यू विभाग, नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागांकडून अहवाल मागविण्यात आले. काही नगरसेवकांविरोधात एकापेक्षा अधिक कारणांच्या तक्रारी असल्याने २७ नगरसेवकांसाठी नोटिसांची संख्या ३७ झाली आहे. मात्र नोटीस बजावली म्हणजे नगरसेवक अपात्र ठरले, असे अद्याप म्हणता येणार नाही. सुनावणीनंतरच प्रशासनाचा निर्णय स्पष्ट होणार आहे. निवडणुकीनंतर : पात्रतेची कसोटी का? निवडणूक होऊन उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्याविरोधात विविध कारणांवरून तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींच्या आधारे संबंधित विभागांकडून कागदपत्रे व अहवाल मागविण्यात आले आणि त्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत आता दोन वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला म्हणजे संबंधित नगरसेवकांविरोधातील तक्रारी तथ्यात्मकदृष्ट्या कितपत खऱ्या आहेत? आणि दुसरा म्हणजे ही बाब निवडणुकीपूर्वीच उपलब्ध होती का, असल्यास तिची दखल त्या टप्प्यावर घेण्यात आली होती का? या प्रश्नांची उत्तरे सुनावणी आणि संबंधित कागदपत्रांच्या तपासणीतून स्पष्ट होईल. अपात्रतेच्या चौकशीतील हे आहेत नगरसेवक }एमआयएम : अब्दुल समीर साजिद, सय्यद उसामा अब्दुल कदीर, नूरजहान इकबाल, फिरोज खान मोईनुद्दीन खान, खान अब्दुल मतीन, मोहम्मद वसीम अलीम अहमद, सय्यद सोहेल, मेराज खान जलील खान, मुन्शी भिकन शेख, शेख नर्गिस सलीम, मो. वाजेद मो. अय्युब, फरजाना शेख गुलाम रसूल, पठाण मजहर पठाण अय्युब, अली मीर वाजीद, अशोक रंगनाथ हिवराळे, काकासाहेब काकडे, तरन्नूम अकील अहमद, शाहीन रहीम पटेल. }भाजप : मयूर वंजारी, संगीता सांगळे, भारती सोनवणे, जीवाकपाल हिवराळे, गणेश नावंदर, विश्वनाथ स्वामी. शिवसेना (शिंदे गट) : अभिजित जीवनवाल. ३७ नोटिसा, पण नगरसेवक २७ या प्रकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नगरसेवकांची संख्या आणि नोटिसांची संख्या वेगळी आहे. २७ नगरसेवकांविरोधात ३७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; कारण काही नगरसेवकांविरोधात एकापेक्षा अधिक स्वरूपाच्या तक्रारी दाखल आहेत. तीन अपत्यांचा मुद्दा, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम तसेच अन्य तक्रारी स्वतंत्रपणे तपासल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक नोटीस स्वतंत्र प्रकरण म्हणून सुनावणीसाठी होणार आहे. निवडणुकीपूर्वी तपासणी झाली; तरी तक्रारी नंतर का? नगरसेवकांच्या पात्रतेशी संबंधित तक्रारी निवडणुकीनंतर पुढे आल्याने निवडणूकपूर्व छाननी आणि निवडणुकीनंतरची अपात्रता प्रक्रिया यातील फरक पुन्हा चर्चेत आला आहे. उमेदवारी अर्ज छाननीवेळी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे पात्रता तपासली जाते; मात्र नंतर एखादी बाब समोर आल्यास किंवा तक्रार दाखल झाल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून स्वतंत्र चौकशी होऊ शकते. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार पात्र ठरला म्हणजे पुढे कधीही अपात्रतेची चौकशी होऊ शकत नाही, असे नाही. या प्रकरणात नेमक्या कोणत्या बाबी निवडणुकीपूर्वी उपलब्ध होत्या. कोणत्या नंतर समोर आल्या, हे संबंधित कागदपत्रांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *