Headlines

पुण्यात 60 हजार कोटींची विकासकामे:पुढील 50 वर्षांचे नियोजन आवश्यक, नितीन गडकारींची माहिती




केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ कार्यक्रमात बोलताना देशाच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांच्या नियोजनावर भर दिला. आजच्या गरजांबरोबरच पुढील २५ ते ५० वर्षांचा विचार करून रस्ते, महामार्ग, पूल आणि दळणवळणाच्या सुविधा विकसित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर आणि कुलसचिव डॉ. शेजूळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गडकरी यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. ‘नॉलेज टू वेल्थ’ हा भविष्यातील विकासाचा मार्ग असून ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना, उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या निर्मितीचा अनुभव सांगताना गडकरी म्हणाले की, भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांची क्षमता निश्चित केली पाहिजे. आजच्या समस्यांवर तात्पुरते उपाय करण्याऐवजी दीर्घकालीन आणि भविष्यवेधी नियोजन गरजेचे आहे. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळते. वाहतूक खर्च कमी झाल्याने भारतीय उद्योग जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनतात. तसेच, चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होते, ग्रामीण भाग मुख्य प्रवाहाशी जोडला जातो आणि नवीन उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी ऑटोमोबाईल उद्योगाच्या वाढीचाही उल्लेख केला. तंत्रज्ञानातील प्रगती, संशोधन, इलेक्ट्रिक वाहने, पर्यायी इंधन आणि जैवइंधनामुळे भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाचा विस्तार होत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि निर्यातीला चालना मिळत असल्याचे गडकरी म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची गुणवत्ता तपासणे, ड्रोन, एआय, लिडार आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने दोष आधीच ओळखणे आवश्यक आहे. ‘रिपेअर आफ्टर फेल्युअर’ऐवजी ‘प्रेडिक्ट बिफोर फेल्युअर’ या पद्धतीने देखभाल करण्यावर त्यांनी भर दिला. ‘नॉलेज विथ एथिक्स’ आवश्यक असून ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, गुणवत्ता आणि मूल्ये जपली पाहिजेत. शॉर्टकटने दीर्घकाळ यश मिळत नाही, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *