Headlines

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांत:नितीन गडकरींची मोठी घोषणा, पुण्यातील वाहतूककोंडीवरही केले भाष्य




पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या रस्ते विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण व्हावा, हे माझे स्वप्न असून त्यासाठी शानदार महामार्ग विकसित केला जात आहे. या प्रस्तावित सहापदरी महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि तिथून पुढे थेट नागपूरपर्यंतचा प्रवास अत्यंत जलद आणि सुलभ होणार असून त्यासाठी विमानाचीही गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच, मुंबई ते बंगळुरू हा प्रवास अवघ्या पाच तासांत पूर्ण होईल, असे दर्जेदार रस्तेही बनवण्यात येत असल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात गडकरी यांनी पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या गंभीर समस्येवरही भाष्य केले. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी येत्या दोन वर्षांत पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी तब्बल 60 हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या भव्य विकासकामांमध्ये 31 हजार 600 कोटी रुपयांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘शिरूर ते पुणे’ प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला असून, यामुळे पुणेकरांचा प्रवास भविष्यात अधिक सुखकर होणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोट्यवधींचे प्रकल्प पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नितीन गडकरी यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची आणि निधीची घोषणा केली आहे. यात हडपसर-यावत मार्गासाठी 5,265 कोटी रुपये, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 53 किमी टप्प्यासाठी 4 हजार कोटी रुपये, तर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किमी मार्गासाठी 15 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, खेड ते नाशिक फाटा (30 किमी) मार्गासाठी 8 हजार कोटी, रावेत ते नऱ्हे मार्गासाठी 6 हजार कोटी आणि पुणे ते सोलापूर महामार्गासाठी 8 हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अटल सेतू ते बंगळुरू कनेक्टिव्हिटी आणि रस्ते विस्तार देशातील रस्ते जाळ्याच्या विस्ताराबाबत माहिती देताना गडकरींनी सांगितले की, अटल सेतू ते पागोटे चौक आणि तिथून पुढे पुण्यापर्यंत एक नवीन आणि वेगवान रस्ता विकसित केला जात आहे. या नवीन मार्गावरून थेट बंगळुरूपर्यंतचा प्रवास अवघ्या पाच तासांत पूर्ण करता येईल, अशी आधुनिक व्यवस्था उभारली जात आहे. तसेच, शिळफाटा ते पनवेल आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सुधारणेवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, या रस्ते विकासाच्या कामांसाठी तब्बल 60 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पायाभूत सुविधांमध्ये ‘एआय’चा वापर आणि टोलबाबत स्पष्टोक्ती पायाभूत सुविधा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वापराबाबत गडकरी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. भविष्यात सॅटेलाईटशी थेट जोडलेली वाहने रस्त्यांवरील त्रुटी आणि दोष त्वरित शोधून काढतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, टोलच्या मुद्द्यावर थेट भाष्य करताना ते म्हणाले की, पूर्वी मुंबई-पुणे प्रवासासाठी 6 ते 7 तास लागायचे, मात्र नवीन महामार्गामुळे हा वेळ अवघ्या दोन-अडीच तासांवर आला आहे. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत करणाऱ्या अशा चांगल्या दर्जाच्या रस्त्यांच्या सुविधा मिळवायच्या असतील, तर त्यासाठी जनतेला टोल द्यावाच लागेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *