Headlines

एसआयआर मोहीम संपली, 3.52 लाख मतदार यादीबाहेरच:24 ऑगस्टला प्रारूप यादी जाहीर, पात्र मतदारांना नोंदणीची संधी




अमरावती: मतदार यादीच्या सूक्ष्म पुनरिक्षणाची (SIR) मोहीम सोमवार, १७ ऑगस्ट रोजी संपली आहे. या मोहिमेनंतरही जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार २६० मतदार अजूनही यादीबाहेरच असल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या एकूण मतदारसंख्येच्या सुमारे १४ टक्के आहे. या यादीबाहेर असलेल्या मतदारांमध्ये मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेले नागरिक आणि इतर कारणांमुळे मूळ ठिकाणी नसलेल्यांचा समावेश आहे. या मतदारांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांनाही पुरवण्यात आली आहे. दरम्यान, ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, त्यांची प्रारूप यादी आगामी २४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयात जाहीर केली जाईल. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्ह्याची संपूर्ण मतदार यादी नव्याने तयार करण्याचे काम गेल्या दीड महिन्यांपासून सुरू होते. या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी नेमलेले बीएलए (ब्लॉक लेव्हल एजंट) आणि प्रशासनाने नियुक्त केलेले बीएलओ (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) यांनी एकत्रितपणे मतदारांच्या घरी जाऊन माहिती गोळा केली. त्यानंतर गणना अर्ज भरून घेऊन ती नावे डिजिटल पद्धतीने संगणकीकृत करण्यात आली. या संगणकीकृत यादीचे प्रारूप यापूर्वीच घोषित होणार होते, परंतु महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे काम रखडल्यामुळे या घोषणेसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार, ही यादी आता २४ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल, अशी माहिती जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अस्तित्वात असलेल्या जुन्या यादीनुसार जिल्ह्यात एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदार होते. यापैकी २१ लाख ८२ हजार ३४८ (८६.१२ टक्के) मतदारांना नव्या यादीत स्थान मिळाले आहे. परिणामी, ३ लाख ५२ हजार २६० (१३.८४ टक्के) मतदार अजूनही यादीबाहेर आहेत. या मतदारांच्या वगळणीची कारणे तपासली असता, तब्बल १ लाख ९ हजार ३२३ मतदार मृत असूनही त्यांची नावे जुन्या यादीत कायम होती, हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, २२ हजार ४३ मतदार हे सरकारी व निमसरकारी अधिकारी-कर्मचारी असून, ते सध्या अमरावती जिल्ह्यात राहत नाहीत. ५५ हजार ७२४ मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवलेली असल्यामुळे त्यांची नावे आता एकदाच नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक नावे अमरावती व बडनेरा या शहरी मतदारसंघातील आहेत. ज्या पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत किंवा ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांना पुन्हा एकदा नाव दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. ही संधी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *