![]()
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १९वे पर्व पुण्यात २२ आणि २३ ऑगस्ट रोजी पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. ‘ब्रॉट टू यू बाय अर्थ’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निसर्गाशी नाते दृढ करणे, हवामान बदल आणि संवेदनशील पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती किर्लोस्कर सीएसआर फाउंडेशनच्या संचालिका आरती किर्लोस्कर यांनी दिली. महोत्सवात चित्रपटांचे स्क्रीनिंग, खुल्या चर्चा, लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असेल. यात तरुण चित्रपटनिर्मात्यांनी तयार केलेले तीन लघुपट, एक फिचर फिल्म आणि छोटेखानी नाट्यप्रयोग सादर केले जातील. मेळघाटमधील आदिवासी समुदायावर आधारित ‘घुंगरू’ हा माहितीपटही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘ऑल्ट ईएफएफ’ने निवडलेल्या पर्यावरणविषयक चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी चर्चांमध्ये सहभागी होतील. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘वसुंधरा सन्मान’ आणि ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कारांनी गौरवण्यात येईल. महोत्सवातील प्रवेश ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर पूर्णपणे विनामूल्य असेल. पहिला दिवस किर्लोस्कर समूहातील कर्मचाऱ्यांसाठी राखीव असून, त्यानंतरचे कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहतील. महोत्सवानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत ‘इको बाजार’ भरविण्यात येणार आहे. येथे पर्यावरणपूरक उत्पादने, शाश्वत जीवनशैली, सेंद्रिय खाद्यपदार्थ आणि सामाजिक उपक्रमांची माहिती मिळेल. ‘द टिंबकटू कलेक्टिव्ह’, संपूर्ण बांबू केंद्र, ‘हुनर गुरुकुल’, ‘आदि ग्राम’, ‘द यूथ कॉस्मो’ आणि ‘विचक्राफ्ट’ यांसारख्या संस्था यात सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सी. बी. तुपे साधना कन्या विद्यालयात अंध आणि अल्पदृष्टी विद्यार्थ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चित्रपट, संवाद आणि सहभागात्मक उपक्रमांद्वारे पर्यावरणरक्षणाचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याचे फाऊंडेशनचे सीईओ जगदीश पुरंदरे यांनी सांगितले.
Source link
किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे 19वे पर्व पुण्यात:22-23 ऑगस्टला, 'ब्रॉट टू यू बाय अर्थ' संकल्पनेवर आधारित