![]()
डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाचे आणि ऑडिओ बुकचे मंगळवारी (दि. १८) प्रकाशन झाले. आयसरचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू यांनी या पुस्तकाचे कौतुक करत ते कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी समग्र वेध घेणारे, संतुलित आणि परिपूर्ण असल्याचे म्हटले. अमलताश बुक्सतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बी. एम. सी. सी. आवारातील डॉ. सायरस पूनावाला सभागृहात करण्यात आले होते. डॉ. नातू त्यावेळी बोलत होते. हे डॉ. शिकारपूर यांचे ६९वे पुस्तक आहे. यावेळी इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे, कल्याणी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश झोपे, बेलराईज इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश इंगळे आणि प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी उपस्थित होते. दृष्टीहीन व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ज्ञान मिळावे यासाठी हे पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपातही प्रकाशित करण्यात आले. नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाईंडच्या प्रवक्त्या सकिना बेदी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. डॉ. अरविंद नातू पुढे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा रोबोटिक्स मानवाची जागा घेत नाहीत, तर ते मानवाला अधिक सक्षम बनवतात. भविष्यातील उद्योग-व्यवसाय मानव, रोबो, शाश्वत आणि हरित ऊर्जा या चार गोष्टींवर अवलंबून असतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना विवेकाशिवाय तंत्रज्ञान विनाशाकडे घेऊन जाते, हे लक्षात ठेवून योग्य मूल्यमापन आणि समाजहित साधताना सारासार विवेकबुद्धी जोपासणे आवश्यक आहे. नैतिक शिक्षण आणि गोपनीयतेलाही महत्त्व दिले पाहिजे. पुस्तकाविषयी बोलताना डॉ. दीपक शिकारपूर यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आज क्रांतिकारक बदल घडत आहेत आणि ते आत्मसात करणे आवश्यक आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर तरुणांना सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी कौशल्यविकास साधणे गरजेचे आहे. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. डॉ. प्रमोद काळे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक सहयोगी व्यवस्था म्हणून एकत्रित केलेले ज्ञान वापरून उत्तरे देते. परंतु ते उत्तर तुम्हाला आवश्यक आहे का, याची निवड करताना सजगता बाळगणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापराने सर्जनशीलता खुंटणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो. अशा वेळी ‘एआय युगाचा वेध’ हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर पालक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.
Source link
'एआय युगाचा वेध' पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. दीपक शिकारपूर यांचे पुस्तक संतुलित, परिपूर्ण – डॉ. अरविंद नातू