Headlines

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर 'ॲक्शन प्लॅन':31 ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक




चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि एमएसआयडीसी यांसारख्या विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार, चाकण औद्योगिक परिसरातील समस्यांवर समन्वयासाठी जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत महसूल, पोलीस आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव दूर करून एकत्रितपणे उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. चाकण औद्योगिक परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात विलंब झाल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असलेल्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागा पार्किंगसाठी वापरल्या जातील, तसेच तळेगाव ते भंडारा डोंगर परिसरातील जागांचे नियोजनबद्ध वापर केले जाईल. शुक्रवारपासून रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करण्यास पूर्णतः प्रतिबंध असेल आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाईल. चाकण औद्योगिक परिसराच्या मोठ्या भौगोलिक विस्ताराचा विचार करून, पोलीस मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे जवान दोन पाळ्यांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी कार्यरत राहतील. रस्त्यावर वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था केली जाईल, जेणेकरून बंद पडलेली वाहने तातडीने रस्त्याच्या बाजूला किंवा निर्धारित ठिकाणी हलवता येतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *