![]()
हिंगोली शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जड व हलक्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 19 ऑगस्ट पासून एक महिना कालावधी करिता लागू राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आहेत. हिंगोली शहरातून मुख्य रस्ता असल्यामुळे वाशीम व विदर्भातून हिंगोली मार्गे औंढा नागनाथकडे जाणारी वाहने हिंगोली शहरातून धावतात. दररोज शेकडो जड वाहने शहरातून धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच हिंगोली शहरात रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातून जाणारी जड वाहनांची वाहतूक राष्ट्रीय महामार्गाच्या सावरखेडा ब्रिजवरून वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गांवर वाहतूक बंद यामध्ये अकोला-वाशिमकडून हिंगोलीकडे येणारी ट्रक, बस व इतर जड वाहने शहरात प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरून सावरखेडा ब्रिज सर्व्हिस रोड व खटकाळी बायपासमार्गे वळविण्यात येतील. तसेच हिंगोली शहरातून अकोला-वाशिमकडे जाणारी जड वाहने खटकाळी बायपास रोड व सावरखेडा ब्रिज रोडमार्गे वळविण्यात येतील. मात्र कार, दुचाकी व इतर हलक्या वाहनांना बासंबा फाट्यावर यू-टर्न घेऊन हिंगोली शहरात प्रवेश करता येईल किंवा हिंगोली शहरातून जाता येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय या वाहतूक बदलामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील जड वाहनांची वर्दळ कमी होऊन वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. वाहनचालकांनी निर्धारित पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे
Source link
हिंगोली शहरात जड वाहनांना बंदी:सावरखेडा ब्रिज अन् बायपासवरून वाहने वळवली, आजपासून 'हे' रस्ते राहणार बंद