Headlines

पालकमंत्री गिरीश महाजनांचा नाशिकसाठी मोठा दावा:म्हणाले- 4 महिने नाशिककरांना थोडा त्रास होईल, पण नंतर शहर पाहून आश्चर्य वाटेल!




नाशिकचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. मुंबई नाका परिसरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण आणि भव्य हार घालून महाजन यांचे जोरदार स्वागत केले. पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाजन यांनी नाशिकच्या विकासाचा मोठा आराखडा मांडत पुढील काही महिने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागेल, असे स्पष्ट केले. “पुढचे 4 ते 6 महिने नाशिककरांना थोडा त्रास सहन करावा लागेल; मात्र त्यानंतर नाशिकचा विकास पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल,” असा दावा गिरीश महाजन यांनी केला. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू असून, हा बदल केवळ सिंहस्थ कुंभमेळ्यापुरता मर्यादित नसून पुढील 40 ते 50 वर्षांचा विचार करून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. महाजन यांच्या नियुक्तीमुळे सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रिपद अत्यंत महत्त्वाचे मानले जात असल्याने महाजन यांच्यासमोर मोठी राजकीय आणि प्रशासकीय जबाबदारी आली आहे. मुंबई नाक्यावर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर महाजन प्रथमच नाशिकमध्ये आले. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई नाका परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले होते. महिला पदाधिकाऱ्यांचीही मोठी उपस्थिती होती. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, पुष्पगुच्छ आणि पारंपरिक पगडी घालून महाजन यांचे स्वागत करण्यात आले. नाशिकच्या महापौरांसह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दीड वर्षांपासून पालकमंत्रिपदाचा निर्णय रखडला होता. अखेर महाजन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाजन यांच्याकडे यापूर्वीपासूनच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी आल्याने कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे नेतृत्व करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार स्वागताला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आपल्यावर दाखवलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, नागरिकांच्या सुविधा आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. “प्रशासनासोबत सर्व नाशिककरांना घेऊन स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा घडवायचा आहे. हा कुंभमेळा केवळ देशाच्या नव्हे, तर जगाच्या पातळीवर केंद्रबिंदू ठरावा, यासाठी प्रयत्न केले जातील,” असे महाजन यांनी सांगितले. नाशिकच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असल्याचा दावा महाजन यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी सुमारे 3.5 हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ते, पूल, घाट, गोदावरी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर भर नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, नदीकाठ विकास आणि सांडपाणी प्रक्रिया यांसारखी मोठी कामे सुरू आहेत. केंद्र सरकारच्या माहितीनुसार मंजूर विकास आराखड्यातही रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नदीकाठ विकास आणि वाहतूक सुविधांचा समावेश आहे. गिरीश महाजन यांनी अंतर्गत रस्ते सिमेंटचे करण्यासह ड्रेनेज व्यवस्था सुधारण्याचे आणि गोदावरी नदी स्वच्छ करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. पुढील काही दशकांचा विचार करून रस्त्यांची कामे केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या कामांना गती देण्याचे आव्हानही मोठे आहे. जुलैमध्ये झालेल्या आढाव्यात काही महत्त्वाची कुंभमेळा कामे अपेक्षेपेक्षा संथ असल्याचे समोर आले होते. गोदावरीवरील घाटांची कामे आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या कामांनाही गती देण्याच्या सूचना महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. ऑगस्टच्या सुरुवातीच्या अहवालानुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील कुंभमेळ्याशी संबंधित 35 पायाभूत प्रकल्पांपैकी 28 रस्ते प्रकल्प आणि 7 पूल प्रकल्प सुरू होते. सुमारे 150 किलोमीटर रस्त्यांच्या कामांचा समावेश असून, अनेक प्रकल्पांची प्रगती सुमारे 30 टक्क्यांच्या आसपास होती. मार्च 2027 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याने वेळेचे मोठे आव्हान आहे. 4 ते 6 महिने त्रास सहन करा याच पार्श्वभूमीवर महाजन यांनी नाशिककरांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांची कामे एकाचवेळी सुरू असल्याने नागरिकांना काही काळ वाहतूक कोंडी, पर्यायी मार्ग, धूळ आणि इतर गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. “पुढचे 4 ते 6 महिने थोडा त्रास सहन करावा लागेल. मात्र त्यानंतर नाशिक शहराचा विकास पाहून बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटेल,” असे महाजन यांनी सांगितले. त्यांनी हा विकास केवळ कुंभमेळ्यासाठी नसून नाशिक शहर आणि जिल्ह्याचा दीर्घकालीन चेहरामोहरा बदलण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. पुढील 40-50 वर्षांसाठी नाशिकचा चेहरामोहरा बदलेल नाशिकला औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्रात वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले. सिंहस्थाच्या निमित्ताने मिळालेली पायाभूत सुविधांची संधी दीर्घकालीन विकासासाठी वापरली जाईल, असा त्यांचा दावा आहे. “हा बदल केवळ कुंभमेळ्यापुरता नाही. पुढील 40 ते 50 वर्षांसाठी नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे,” असे त्यांनी म्हटले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी स्वतंत्र कायदेशीर आणि प्रशासकीय यंत्रणाही राज्य सरकारने उभी केली आहे. 2025 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम लागू करण्यात आला असून, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिकला देशातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक बनवायचे नाशिक हे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे शहर असून त्र्यंबकेश्वर, वणी आणि गोदावरीमुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी क्षमता आहे. सिंहस्थाच्या माध्यमातून या पर्यटन क्षमतेला मोठी चालना मिळू शकते, असे महाजन यांनी सांगितले. नाशिक शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्याबरोबरच उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंहस्थासाठी होणारी पायाभूत सुविधांची उभारणी भविष्यातील नाशिकच्या विकासाचा पाया ठरेल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, विकासकामांची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर भरून काढणे हे महाजन यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कारण एकीकडे मार्च 2027 ची अंतिम मुदत जवळ येत आहे, तर दुसरीकडे काही महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन नाशिकच्या विकासकामांना किती वेग देतात, नागरिकांना दिलेल्या 4 ते 6 महिन्यांच्या त्रासानंतर खरोखरच शहराचा चेहरामोहरा किती बदलतो, आणि सिंहस्थापूर्वी सर्व महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतात का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… संजय राऊत हे कामशास्त्री, त्यांनी न्यायालयासंदर्भात बोलू नये: मनपाच्या खर्चावर बोलण्यापूर्वी पेडणेकरांनी स्वतःच्या काळातील हिशेब द्यावा- नवनाथ बन संजय राऊत हे कामशास्त्री आहेत, त्यांनी न्यायालय आणि संविधानाबद्दल बोलू नये. एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यावर ठाकरे गटाची पळता भुई थोडी होईल, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. रामशास्त्री कोण आहे हे शोधण्यापेक्षा राऊतांनी आपण कामशास्त्री कसे झालो याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *