![]()
बाललैंगिक अत्याचाराच्या (पॉक्सो) गुन्ह्यामुळे पसार झालेला बीडचा राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुकाराम गंगाधर करांडे (२८, रा. खडकी देवळा, ता. वडवणी, ह.मु. स्वराज्यनगर, बीड) याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला काही दिवसांपूर्वीच अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी जामीन मिळाला होता. करांडे याने खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन वेळा स्थान मिळवून महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व केले होते. १५ दिवसांपूर्वी तो बार्शी रोडवर अवैध पिस्तूल बाळगताना आढळून आला होता. पोलिसांनी त्याला अटक करत पिस्तुल जप्त केले होते. या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर लगेच अल्पवयीन मुलीने त्याच्याविरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली होती. मित्रांसोबत कॅफेमध्ये पिस्तूल लावून करांडे याने अत्याचार केल्याची तक्रार आल्याने, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर तो बीडमधून पसार झाला होता. दरम्यान, पसार असताना तो पुण्यात गेला होता. पुण्यातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. उद्या होती जामिनावर सुनावणी बाललैंगिक अत्याचार प्रकरणात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी करांडे व त्याच्या मित्राने न्यायालयात धाव घेतली होती. १८ ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार होती. मात्र सुनावणी झाली नाही. २१ ऑगस्टला ही सुनावणी होती. मात्र, त्यापूर्वी पिस्तुलाचा गुन्हा नोंद असल्याने अटकपूर्व जामीन मिळणार नाही या तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पीडितेनेच दिली पिस्तुलाची माहिती करांडे हा बीड तालुक्यातील एका गावातील शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता. गावातील मुलीशी त्याची मैत्री झाली होती. नंतर ती मुलगी बीडमध्ये शिक्षणासाठी आल्यावर त्याने मुलीला मित्रांच्या मदतीने ब्लॅकमेल केले. पिस्तुलाचा धाक दाखवला. मुलीच्या तक्रारीनंतर पिस्तुलाचे बिंग फुटल्याने त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी पिस्तूल जप्त केल्यावर मुलीने दुसरी तक्रार दिली.
Source link
‘पॉक्सो’प्रकरणी पसार बीडच्या खेळाडूची पुण्यात आत्महत्या:अवैध पिस्तूल प्रकरणातही गुन्हा होता नोंद