Headlines

चांदवडमध्ये शिक्षकांची 108 पदे रिक्त, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान:जागा न भरल्यास विद्यार्थ्यांसह जनआंदोलन; संजय जाधव यांचा निवेदनाद्वारे इशारा‎


.

तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची १०८ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुख्याध्यापकांची १२, पदवीधर शिक्षकांची ४३ आणि प्राथमिक शिक्षकांची ५३ पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या बदल्या व सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेली ही रिक्त पदे त्वरित भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संजय जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मागणीची दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांसह जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. काही शाळांमध्ये मुख्याध्यापकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे अध्यापन कार्यावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह पटसंख्येवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना खासगी शाळांचा वाढीव खर्च परवडत नसल्याने पालकांना नाईलाजाने मुलांना तालुक्याच्या ठिकाणी अथवा खासगी शाळांमध्ये पाठवावे लागत आहे. त्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. शासकीय शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासनाकडून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’सारखी मोहीम राबवली जात आहे. मात्र, शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध नसतील, तर या मोहिमेचा उद्देश कसा साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलून रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह जनआंदोलन छेडण्याचा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच चांदवड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

शिक्षकांच्या बदल्या आणि सेवानिवृत्तीमुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी मुख्याध्यापकही नाहीत. यामुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आवश्यक तेथे नवीन शिक्षकांची नियुक्ती करावी. अन्यथा पंचायत समितीसमोर तीव्र जनआंदोलन उभारू. – संजय जाधव, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *