![]()
सांगोला आपली उपजीविका ज्यांच्यावर अवलंबून आहे, अशा मेंढरांप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने सांगोला शहरातील गावडे वस्ती येथे मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. घरापुढे मंडप उभारला. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे वाढदिवसाचा बॅनरही लावला. विशेष म्हणजे या बॅनरवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा फोटो प्रसिद्ध केला. अन् एवढ्या व्यापातून आमदार डॉ. देशमुख यांनी हजेरी लावून मेंढरांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापला. घरातील सदस्याच्या वाढदिवसाप्रमाणे हा सोहळा रंगला होता. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्याची मागील सहा वर्षांपासून परंपरा आहे. येथील सिद्धेश्वर गावडे यांच्या पुढाकारातून त्यांच्या घराजवळ हा वाढदिवस उत्साहात साजरा केला. या वेळी गावडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावडे कुटुंबीयांकडे सध्या सुमारे ९० मेंढरं असून, त्यांच्याप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो. यंदाही मेंढरांसाठी खास तीन मजली केक तयार करून आणला होता. आमदार देशमुख, नातेवाईक, मित्रमंडळी असे ३०० हून अधिक नागरिक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसाठी गावडे कुटुंबीयांच्या वतीने भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच घरी सोहळा सुरू होता. केक कापून वाढदिवस साजरा करताना आमदार व गावडे कुटुंबातील सदस्य. गावडे वस्तीवर सकाळपासूनच लगीनघाईप्रमाणे लगबग सुरू होती. घरातील आणि पाहुणे मंडळींनाही पिवळे फेटे बांधले होते. सकाळपासूनच गावडे यांच्या घरी उत्साह होता. याबरोबरच मेंढरांनाही सजवले होते. गुलालाने रंगवले. नातेवाईक वऱ्हाडी म्हणून आले. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख गेल्या सहा वर्षांपासून आवर्जून उपस्थित राहतात. आमदार होण्यापूर्वीही या कार्यक्रमाला ते उपस्थित राहात होते. आणि आता आमदार झाल्यानंतरही त्यांनी उपस्थिती लावली. गावडे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला.
Source link
जिव्हाळा, लावलेल्या लळ्यापोटी मेंढरांचा वाढदिवस:श्रावणात वाढदिवस करण्याची गावडे कुटुंबीयांची परंपरा, बॅनरवर छबी व आमदारांची उपस्थिती