Headlines

35 कोटी मंजूर; 212 घंटागाड्या, 450 कर्मचाऱ्यांद्वारे कचरा संकलन:प्रति मेट्रिक टन 4,802 रुपये दर; पाच वर्षांसाठी कंपनीला कंत्राट‎




शहरातील घराघरातून कचरा संकलन आणि त्याची वाहतूक करण्यासाठी मे. अर्बन इनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, नागपूर या कंपनीला पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यास महानगर पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. कंपनीला प्रति मेट्रिक टन ४८०२ रुपये दराने काम देण्यात येणार आहे. या व्यवस्थेवर मनपाला वर्षाला सुमारे ३५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय मंजूर करण्यात आला. कचरा संकलनासाठी २१२ घंटागाड्या आणि कंपनीकडून नियुक्त ४५० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. महापालिका क्षेत्रातील चारही झोनमध्ये संकलन केंद्र सुरू झाले आहेत. त्यामुळे घरांमधील कचऱ्यासोबतच नाल्या, खुले भूखंड, भाजी बाजारातील कचरा तसेच मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही या व्यवस्थेत समाविष्ट करण्यात आली आहे. महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी महाटेंडरवर तिसऱ्यांदा निविदा मागवली होती. त्यात अर्बन इनव्हायरोची एकमेव निविदा प्राप्त झाली. त्यामुळे निर्धारित दरानुसार कंत्राट मंजूर करण्यात आले, असे स्थायी समितीच्या सभेत सांगण्यात आले. शहरातील १०० टक्के कचरा संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संपूर्ण जबाबदारी एजन्सीची आगामी १५ दिवसांत प्रत्यक्ष कचरा गोळा करण्याचे काम सुरू होईल, असे सभेत सांगण्यात आले. गोळा केलेला कचरा घरापासून ते मुख्य कचरा संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्याची संपूर्ण जबाबदारी या एजन्सीची असणार आहे. जन्म-मृत्यू नोंदणीला येणार गती : अलोने चार उपनिबंधकांच्या नवीन लॉगीन आयडीला शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांनी सभेत दिली. त्यामुळे जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी होणारी नागरिकांची फरपट दूर होण्यास मदत होणार आहे. दरवर्षी कंपनीचे ऑडिट करा कचरा संकलनासाठी मोठा खर्च होत असल्याने संबंधित कंपनीच्या कामाचे दरवर्षी ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक हरीश अलिमचंदानी यांनी सभेत केली. कंत्राटाच्या मोबदल्यात प्रत्यक्ष किती कचरा संकलित केला जातो, घंटागाड्या नियमित धावतात का, मनुष्यबळ आहे का, याचीही तपासणी आवश्यक आहे, असे मुद्दा त्यांनी मांडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *