![]()
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पक्षांतराचे प्रकरण योग्य रीतीने हाताळले नाही. त्यामुळे आमचा त्यांच्यावरील विश्वास पूर्ण उडाला आहे. म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता तुम्हीच आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करावा, असा मुद्दा उद्धवसेनेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी गुरुवारी युक्तिवादात मांडला. “पाचपैकी तीन आमदार फुटले म्हणून मूळ राजकीय पक्षच त्यांच्या हवाली करणार का? केवळ विधिमंडळातील तात्पुरत्या बहुमताच्या जोरावर पक्ष आणि चिन्ह बहाल केल्यास पक्षांतरबंदीचे १० वे परिशिष्ट निष्प्रभ ठरेल आणि देशात अराजकता माजेल’ असे ते म्हणाले. कपिल सिब्बल यांच्याप्रमाणे कामत यांनीही धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देता येत नसेल, तर ते तात्काळ गोठवा, अशी मागणी केली. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने, “प्रकरणात निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आमच्याकडे आहेत,” अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. उद्धवसेनेचा ८ दिवसांचा युक्तिवाद पूर्ण झाला. आता शिवसेनेला (शिंदे गट) बाजू मांडण्यासाठी तेवढाच वेळ मिळू शकतो. ॲड. देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातील प्रमुख मुद्दे उद्धवसेनेकडे १९ लाखांवर तर शिवसेनेकडे ४ लाख सदस्य होते.
२०१८ ची पक्षघटना असंवैधानिकचा आक्षेप शिंदेंनी प्रारंभी निवडणूक आयोगापुढे घेतलाच नव्हता.
आमदारांच्या अपात्रतेचा तिढा प्रलंबित असताना विधिमंडळ संख्याबळाआधारे पक्ष व चिन्ह बहाल करणे हे आयोगाच्या न्यायिक कार्यकक्षेबाहेरचे आहे.
केवळ १/३ आमदार वेगळे झाले म्हणजे पक्षात फूट पडत नाही.
Source link
विधानसभाध्यक्षांवरील विश्वास उडाल्याने सुप्रीम कोर्टात धाव; उद्धवसेनेचा युक्तिवाद:बहुमतावर पक्ष, चिन्ह बहालीने देशात अराजकता- ॲड. कामत