Headlines

विरुद्ध दिशेने येऊन उडवले:संभाजीनगर शहरात भरधाव कारची दुचाकीला धडक; सिल्लोडचे दोन सख्खे भाऊ जागीच ठार




पोटाची खळगी भरण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच शहरात आलेल्या दोन सख्ख्या भावांच्या दुचाकीला चिकलठाणा एमआयडीसीमधील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास भरधाव फॉर्च्युनर कारने विरुद्ध दिशेने येऊन धडक दिली. यात निखिल अंकुश आरके (२३), कपिल अंकुश आरके (१८) (दोघे रा. गल्ली नंबर १२, ए-७, आंबेडकरनगर, मूळ रा. सिल्लोड) या सख्ख्या भावांना प्राण गमवावे लागले. निखिल आणि कपिल हे दोघेही भाऊ प्रोझोन मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये कामाला होते. बुधवारी कपिलची ड्यूटी संपल्याने तो घरी आला. मध्यरात्री तो भाऊ निखिलला आणण्यासाठी दुचाकीवरून (एमएच २० एचजे ३८२३) गेला होता. त्याला घेऊन घरी परतत असताना विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या फॉर्च्युनरने (एमएच २८ बीएस ०९९०) त्यांना उडवले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक (प्रभारी अधिकारी) गणपत सत्वजी राहिरे, सहायक निरीक्षक भरत पाचोळे, उपनिरीक्षक काळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणांचे मामा फकिरा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर (एमएच-२८-बीएस-०९९०) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालक अद्याप फरार आहे. ही धडक इतकी भयंकर होती की दुचाकीचा चक्काचूर होऊन तिचे स्पेअरपार्ट‌्स आणि तुकडे कारच्या बोनेटमध्ये अडकले होते. अपघातग्रस्त फॉर्च्युनर कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन थांबली होती. अपघातानंतर तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने दोन्ही गंभीर जखमी भावांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पहाटे २:२७ वाजता त्यांना मृत घोषित केले. सिल्लोड तालुक्यात मिस्त्रीकाम करून अंकुश आरके आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना कपिल, निखिलसह एक लहान मुलगी आहे. मुले मोठी झाल्याने त्यांनी चांगल्या कामाला लागावे, या हेतूने दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी दोन्ही मुलांना शहरात मामा फकिरा गोविंदा पवार (३४) यांच्याकडे पाठवले होते. ‘दादाला घेऊन येतो’ असे सांगून घराबाहेर पडलेला कपिल रात्री १ वाजला तरी परतला नाही. घरापासून १० मिनिटांच्या अंतरासाठी एवढा वेळ लागत असल्याने मामा फकिरा यांनी कपिलला फोन केला. सुरुवातीला कॉल कुणी उचलला नाही. काही वेळाने फोन उचलला गेला, मात्र पलीकडून पोलिसांनी थेट अपघाताची माहिती दिली. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेमुळे आरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *