Headlines

ऐन सणात साखर महाग:साखरेचा 80 रुपये किलोचा कडू डोस म्हणजे 20,000 कोटींचा काळाबाजार; शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप




देशात आणि राज्यात सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अवघ्या 3 महिन्यांत साखरेच्या किमती तब्बल 40% ने वाढल्याने किरकोळ बाजारात साखरेने 80 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. साखरेच्या या ऐतिहासिक दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. “देशात साखरेचा पुरेसा साठा शिल्लक असतानाही झालेली ही दरवाढ संशयास्पद असून, यामागे साधारण 20,000 ते 22,000 कोटी रुपयांचा मोठा काळाबाजार सुरू आहे. हा पैसा शेतकऱ्यांना नव्हे, तर व्यापारी आणि रिकव्हरी चोरणाऱ्या कारखानदारांच्या घशात घालण्याचे कारस्थान आधीच ठरले होते,” असा थेट आणि खळबळजनक आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. राज्यातील बाजारपेठेत सध्या साखर कडू झाली असून, ग्राहकांच्या खिशाला मोठा कात्री बसत आहे. साखरेच्या दराने इतिहासातील सर्व उच्चांक मोडीत काढले असून, घाऊक बाजारात दर 7,500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात तर वाशिमसारख्या जिल्ह्यात साखर थेट 80 रुपये किलोवर विकली जात आहे. या धक्कादायक दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आक्षेप घेत सरकार आणि कारखानदारांना कटघऱ्यात उभे केले आहे. “यंदाचा साठा पाहता आगामी दिवाळीपर्यंत आणि पुढील हंगामात देशाला पुरेल इतके उत्पादन उपलब्ध असतानाही ही अचानक झालेली भाववाढ संशयास्पद असून यामागे मोठा ‘गौडबंगाल’ आहे,” असा खळबळजनक दावा शेट्टी यांनी केला आहे. “नफा शेतकऱ्याला नाही, तर काळा पैसा वाल्यांच्या घशात” राजू शेट्टी यांनी साखरेच्या बाजारातील अंतर्गत साखळीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, साखरेचे भाव पुढील दोन महिन्यांत वाढवायचे आधीच निश्चित झाले होते. त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी मंदीच्या काळातच कमी दराने साखर खरेदी करून ती कारखान्यांच्या गोदामात साठवून ठेवली. आता बाजार कडाडल्यावर “आम्ही आधीच साखर विकली असून आमच्याकडे स्टॉक नाही,” असा बनाव कारखानदार करत आहेत. रेकॉर्डवर नसलेली आणि उसाची रिकव्हरी चोरून तयार केलेली काळी साखर आता चढ्या दराने बाजारात आणली जात आहे. हा सर्व नफा प्रामाणिक शेतकऱ्यांऐवजी काळा पैसा तयार करणाऱ्या कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे. ‘स्वाभिमानी’चा सरकारला इशारा; 3 प्रमुख मागण्या संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये तब्बल 20,000 ते 22,000 कोटी रुपयांचा व्यवहार सुरू असल्याचा संशय राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारकडे तातडीने पुढील पावले उचलण्याची मागणी केली आहे: सरकारी आयातीवर प्रश्नचिन्ह “सरकारने बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी साखर आयात करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तांत्रिक कारणांमुळे ऑक्टोबरच्या आत परदेशातून साखर भारतात येऊच शकत नाही,” याकडेही शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील शिल्लक साठा पुरेसा असताना ग्राहकांना लुटण्याचा हा प्रकार थांबवून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. असे वाढलेत दर साखर:
सध्याचा दर: 67 ते 80 रुपये
3 महिन्यांपूर्वी: 48 रुपये
वाढ किती झाली?: +19 रुपये वाढ (+39.58%) गूळ:
सध्याचा दर: 65 रुपये
3 महिन्यांपूर्वी: 50 रुपये
वाढ किती झाली?: +15 रुपये वाढ (+24.00%) तुकडा तांदूळ:
सध्याचा दर: 29 रुपये
3 महिन्यांपूर्वी: 25 रुपये
वाढ किती झाली?: +4 रुपये वाढ (+16.00%) मक्याचे पीठ:
सध्याचा दर: 40 रुपये
3 महिन्यांपूर्वी: 36 रुपये
वाढ किती झाली?: +4 रुपये वाढ (+11.11%) इडली रवा / राइस फ्लोअर:
सध्याचा दर: 42 रुपये
3 महिन्यांपूर्वी: 38 रुपये
वाढ किती झाली?: +4 रुपये वाढ (+10.53%) पशुखाद्य:
सध्याचा दर: 32 रुपये
3 महिन्यांपूर्वी: 29 रुपये
वाढ किती झाली?: +3 रुपये वाढ (+10.34%) पोल्ट्री फीड:
सध्याचा दर: 25 रुपये
3 महिन्यांपूर्वी: 23 रुपये
वाढ किती झाली?: +2 रुपये वाढ (+08.70%) दरवाढीमागील तांत्रिक गणित: इथॅनॉलचा वापर की सट्टेबाजी? इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (ISMA) मते, आगामी 2026-27 च्या गाळप हंगामापूर्वीचा कारखान्यांचा ‘ओपनिंग स्टॉक’ (शिल्लक साठा) गेल्या वर्षीच्या 47 लाख टनांवरून घसरून 32 लाख टनांवर आला आहे. साठा कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे 2025-26 मध्ये 25 लाख टन साखरेचा वापर इथॅनॉल निर्मितीसाठी केला गेला. इथॅनॉल निर्मितीच्या मानकांनुसार 67% मका व तांदूळ आणि 33% उसाचा वापर होतो, ज्यामुळे या सर्वच वस्तू महागल्या आहेत. मात्र, ‘इस्मा’चे महासंचालक दीपक बलानी यांनी राजू शेट्टी यांच्या संशयाला काहीसा दुजोरा देत म्हटले आहे की, देशात साखरेची कोणतीही टंचाई नाही. ही दरवाढ केवळ बाजारातील घबराट (पॅनिक बाइंग) आणि सट्टेबाजीमुळे झाली आहे. सरकार ॲक्शन मोडमध्ये: शुल्कमुक्त आयात आणि साठा मर्यादा या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्र सरकारने गुरुवारी तातडीने पावले उचलली आहेत. आता साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन ‘रॉ शुगर’च्या शुल्कमुक्त आयतीला सरकारने मंजुरी दिली आहे. दरमहा 10 टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या घाऊक ग्राहकांवर कडक निर्बंध लादण्यात आले असून, आता हे ग्राहक केवळ 15 दिवसांच्या वापराइतकीच साखर साठवून ठेवू शकणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *