Headlines

Latur Teacher Vaibhav Kulkarni Wins National Teacher Award 2026



लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक वैभव वसंतराव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शिक्षक सक्षमीकरण आणि डिजिटल शैक्षणिक

.

वैभव कुलकर्णी यांना अध्यापन क्षेत्राचा तीन दशकांहून अधिक काळ समृद्ध अनुभव असून, त्यांनी दमन, तुळजापूर आणि सोलापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रदीर्घ सेवा बजावली आहे. 1 मे 2026 रोजी त्यांची लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात नियुक्ती झाली.

गणित विषय विद्यार्थ्यांना अत्यंत सोपा, आनंददायी आणि कृतीशील पद्धतीने शिकविण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. त्यांच्या ‘Maths Made Easy with Vaibhav Kulkarni’ या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर 700 हून अधिक शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध आहेत. या वाहिनीद्वारे इयत्ता नववी व दहावीच्या एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांवरील सोडवणुकी, क्षमताधारित प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न तसेच शिक्षक प्रशिक्षणासाठी उपयुक्त साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले असून, एनसीईआरटी स्टुडिओ, पीएम ई-विद्या यांसारख्या उपक्रमांत त्यांनी विविध सत्रे घेतली आहेत. याशिवाय, एनआयओएस आणि स्वयंप्रभा या राष्ट्रीय व्यासपीठांद्वारेही त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे.

शिक्षक प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी विविध संस्थांमध्ये सुमारे 20 प्रशिक्षण सत्रे घेऊन 800 हून अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. यामध्ये गणित, विज्ञान आणि भाषा विषयांच्या अध्यापनासाठी क्रीडा, कथाकथन, खेळणी व कला यांचा वापर करून अनुभवाधारित अध्यापन पद्धती शिक्षकांना समजावून सांगितल्या आहेत. तसेच, कमी खर्चातील नाविन्यपूर्ण अध्यापन साहित्य तयार करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य असून पायथागोरस प्रमेयाच्या विस्तारासह समांतर रेषा व अनुरूप कोन यांसारख्या कठीण गणितीय संकल्पना सहज समजाव्यात, यासाठी त्यांनी विविध प्रतिकृती विकसित केल्या आहेत.

महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत वैभव कुलकर्णी यांनी आपल्या अध्यापन पद्धती पोहोचवल्या आहेत. यापूर्वी त्यांना जवाहर नवोदय विद्यालय समितीचा ‘गुरुश्रेष्ठ पुरस्कार’ चार वेळा मिळाला असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडूनही त्यांच्या कार्याचे कौतुक झाले आहे. आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि संपूर्ण जवाहर नवोदय विद्यालय परिवाराला दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *