Headlines

केमच्या कुंकात रासायनिक घटक; समितीने बैठकीत व्यक्त केली चिंता:विधिमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीमध्ये केली पोलखोल‎



विधिमंडळ अंदाज समितीच्या पाच आमदारांच्या पथकाने पंढरपूर शहराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात समितीने शहरातील केवळ एकाच रस्त्याची पाहणी करून विठ्ठल दर्शन घेत पुढच्या तालुक्यात प्रयाण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

.

सोलापूर केमचे प्रसिद्ध असलेल्या कुंकवामध्ये रासायनिक घटक आहेत. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी पोलखोल शनिवारी विधिमंडळाच्या अंदाज समिती बैठकीत केली. आढावा बैठकीत विविध प्रश्न मांडले. समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी या प्रश्नाला हात घातला. शनिवारी, अंदाज समितीने सोलापुरातील विविध शासकीय विभागांचा आढावा घेतला. सकाळी ८.३० ऐवजी ही बैठक तब्बल दीड तास उशिराने, सकाळी १० वाजता सुरू झाली. यात समाजकल्याण, भूसंपादन, पोलिस प्रशासन यासारख्या महत्त्वाच्या विभागांना बगल देण्यात आली.

मात्र, ज्या विभागांचा आढावा झाला तेथे भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे सांगत समितीने प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे केले. जिल्ह्यात १ लाख २६ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी आहे, प्रत्यक्ष कामांवर यूपी-बिहारचे मजूर काम करतात. मग स्थानिक कामगारांची निवड कशी झाली? असा प्रश्न उपस्थित झाला. शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी २० जणांवर गुन्हे दाखल आहेत. यावर मुंडे पॅटर्नच्या धर्तीवर सोलापुरात भ्रष्टाचार रोखण्यासाठी ‘कार्तिकेयन पॅटर्न’ राबवण्याच्या सूचना समितीने केल्या. शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना १३४ रुपये किलोचा हिरवा वाटाणा देण्याऐवजी केवळ ३० रुपये किलोचा पांढरा वाटाणा मागील पाच वर्षांपासून दिला जात आहे. कुकरच्या दहा शिट्ट्या झाल्या तरी हा वाटाणा शिजत नाही. धान्यही सीलबंद पॅकिंगमध्ये येत नसल्याचे आमदार कैलास पाटील यांनी उघडकीस आणले. केम ग्रामस्थांनी मांडल्या गावच्या व्यथा केम ग्रामस्थांनी गावातील विविध अडचणींचा पाढाच अंदाज समितीसमोर मांडला. करमाळा तालुक्यातील केमची ‘कुंकवाचे गाव’ म्हणून ओळख आहे. या गावातील कुंकू उद्योगाला रेल्वे सुविधेअभावी फटका बसत आहे. केम रेल्वे स्थानकावरील पार्सल सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी या वेळी केली. पार्सल सेवा बंद असल्यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होत असून, या उद्योगावर अवलंबून असलेले उद्योजक, व्यापारी, कामगार अडचणीत आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

समितीच्या या दौऱ्यादरम्यान स्थानिक नगरसेवक राहुल शिंदे-नाईक यांनी पंढरपूर शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि चंद्रभागा नदीवरील पुलाच्या कामामुळे उद्भवलेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. अवघ्या दीड लाख क्यूसेक पाण्याच्या विसर्गातही नदीकाठच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची जमीन वाहून जात असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *