![]()
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार सडकून टीका करणारे ज्येष्ठ वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आता मोठा दणका बसला आहे. बीडमध्ये शनिवारी झालेल्या एका मोर्चामध्ये जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सदावर्ते यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नेमके प्रकरण काय? बीडमध्ये शनिवारी विलास घुले हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी नेहमीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. सदावर्ते यांच्या या प्रक्षोभक वक्तव्यानंतर मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली. यानंतर जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांनी थेट शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून सदावर्तेंविरोधात अधिकृत फिर्याद दिली. या फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी सदावर्ते यांच्याविरोधात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. सदावर्तेंनी भाषणात काय म्हटले होते? मोर्चामध्ये बोलताना सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांची तुलना थेट आजाराशी केली होती. “मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून राज्यात व्हायरस पसरवण्याचे काम सुरू आहे. यांना राज्याचा महसूलमंत्री म्हणून एक ओबीसी नेता नको आहे,” असा घणाघात सदावर्ते यांनी केला होता. …तर आम्ही एकनाथ शिंदेंचा अपमान करू भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दाखला देत सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांचेही नाव या वादात ओढले. ते म्हणाले, “जरांगे पाटलांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा वारंवार अपमान केला जात आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेमका किती सहभाग आहे, हे मला माहिती नाही. परंतु, जर यापुढे मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांचा अपमान केला, तर आम्हीदेखील एकनाथ शिंदे यांचा अपमान करू,” असा थेट इशाराच सदावर्ते यांनी भरसभेत दिला होता. दरम्यान, सदावर्ते यांच्या या विधानांमुळे आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे आता मराठा समाज विरुद्ध सदावर्ते हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हेही वाचा.. मुंबईत 22 फूट उंच गणेश मूर्ती कोसळली, 2 ठार: 5 जण जखमी; पंडालमध्ये आणत होते, 50 मीटर अंतरावर असताना दुर्घटना महाराष्ट्रातील मुंबईत बायकुला येथून भुलेश्वरला आणली जाणारी 22 फूट उंचीची एक गणेश मूर्ती मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर कोसळली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी झाले आहेत. हा अपघात 22 ऑगस्टच्या रात्री 9:51 वाजता बलराम मर्चंट रोड, जय अंबे चौकाजवळ घडला. प्राथमिक तपासणीत रस्त्यावर कोणताही मोठा खड्डा आढळला नाही. मूर्तीचे संतुलन बिघडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सविस्तर वाचा
Source link
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ:मनोज जरांगेंवर वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल