![]()
गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरातील किरकोळ बाजारात साखर थेट ७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात शहरात ४४ रुपये किलो असणाऱ्या साखरेच्या भावात महिनाभरात तब्बल ३१ रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ बाजारावर थेट परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांचे सणासुदीचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे बाजारात साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले. मात्र, बाजारात साखरेचे दर वाढले असले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. साखर कारखानदार शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपीनुसार दर देत नाहीत. ही दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या मुळावर उठली आहे. साखर कारखानदार आणि सरकार यांच्यातील संगनमतामुळेच शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा. ग्राहकांना साखरेची दरवाढ सुसह्य व्हावी. त्यासाठी अनुदान देऊन बाजारभावातील तफावत भरून काढावी, असे रविकांत तुपकर म्हणाले.दरम्यान, दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने दशकभरानंतर १० लाख मेट्रिक टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास मंजुरी दिली आहे. ही साखर बाजारात आल्यानंतर पुढील काही आठवड्यांत नागरिकांना थोडा दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. सणासुदीमुळे वाढती मागणी : गणेशोत्सव, दसरा व दिवाळीमुळे मिठाई, बेकरी व खाद्यपदार्थ उद्योगांकडून साखरेची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव वाढू शकतात. उत्पादनात मोठी घट : महाराष्ट्र व कर्नाटकातील पावसाची तूट, कीडरोग व उसाच्या उत्पादकतेत घट झाल्याने यंदा देशातील साखर उत्पादनाचा अंदाज कमी झाला. इथेनॉल निर्मिती व साठेबाजी : ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीसाठी होत असल्याने बाजारात साखरेचा पुरवठा घटला आहे. त्यातच तुटवड्याच्या भीतीने व्यापाऱ्यांकडून साठेबाजी वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान साखर कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे वेळेवर देत नाहीत. सरकार व साखर कारखानदारांच्या संगनमताने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने अनुदान देऊन नागरिकांना योग्य दरात साखर व शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळवून द्यावे. दरवाढीसह वाहनांचेही नुकसान ^साखरेच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढत आहे. साखरेसाठी वापरला जाणारा ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळत असल्याने साखरेचे दर वाढत आहेत. तसेच इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. इथेनॉल धोरणाचा सर्वसामान्यांवर परिणाम होत आहे. – जगतपाल जाधव, नागरिक, अकोला. कारखानदार, व्यापाऱ्यांच्या हितासाठी कारस्थान ^इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाच्या वापराने साखरेचे उत्पादन घटले आहे, हे खरे आहे. मात्र, बाजारात झालेली साखरेची दरवाढ ही सामान्य ग्राहकांना लुटून व्यापाऱ्यांचे भले करण्यासाठी रचलेले कटकारस्थान आहे. दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा नाही. – रविकांत तुपकर, क्रांतिकारी शेतकरी संघटना.
Source link
इथेनॉल निर्मितीचा परिणाम; साखर 75 रुपयांवर:जुलैतील 44 रुपयांची साखर महिनाभरात भडकली; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले