![]()
पुण्यात पार पडलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला भाजपने ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खरपूस समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचा आजचा नागपूरमधील ‘जेन झी’ मेळावा आणि राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना हे दोन्ही ‘पेड इव्हेंट’ असल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केला. तसेच, शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘लाडकी बहीण योजना आणि भाजप हाच पेड इव्हेंट’ राहुल गांधींच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “काल मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की पुण्याचा इव्हेंट पेड होता. मग आज नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा जो कार्यक्रम सुरू आहे, तो काय आहे? तुम्ही विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा अपमान करत आहात. मते विकत घेण्यासाठी महिलांना १५०० रुपये दिले जाणारी ‘लाडकी बहीण’ योजना काय होती? तो पण तर एक पेड इव्हेंटच होता. बिहारमध्येही १०-१० हजार दिले, तोही पेड इव्हेंट होता. मुळात भाजप हा कोणताही पक्ष राहिला नसून तो स्वतःच एक मोठा ‘पेड इव्हेंट’ झाला आहे. आज नागपुरात जे ‘जेन झी’ तरुण जाणार आहेत, ते १०० टक्के पेड आहेत.” पोषण आहारातील भ्रष्टाचार आणि अंगणवाडी शिक्षिकेचा मुद्दा राज्यातील शालेय पोषण आहारातील निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचाराचा एक गंभीर मुद्दाही राऊतांनी उपस्थित केला. “आंबेगावमधील एका शाळेत अत्यंत निकृष्ट भोजन आणि कच्चे धान्य दिले जात आहे. कुकरच्या १३ शिट्ट्या घेतल्या तरी वाटाणा शिजत नाही. हा धक्कादायक प्रकार समोर आणणाऱ्या रेश्मा पारधी या अंगणवाडी शिक्षिकेला सरकारने निलंबित केले होते. नंतर लोकांच्या दबावामुळे तिला पुन्हा सेवेत घेतले, हे ठीक आहे. पण आता मुख्यमंत्र्यांनी तो न शिजणारा वाटाणा स्वतः खाऊन दाखवावा आणि फडणवीसांनी ते धान्य आपल्या घरी नेऊन शिजवावे,” असे उघड आव्हान राऊत यांनी दिले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि उपहासात्मक टीका भाजपच्या कार्यपद्धतीवर अत्यंत उपहासात्मक टीका करताना राऊत म्हणाले की, “मोदी आणि फडणवीस यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक दिपके किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावायला हवेत. राहुल गांधींना आजच्या ‘जेन झी’ तरुणांचे प्रश्न समजले, पण या सरकारला ते अजूनही कळलेले नाहीत. राहुल गांधींच्या कालच्या कार्यक्रमानंतरच त्यांना नागपुरात असा कार्यक्रम घेण्याचे सुचले आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. हेही वाचा.. राहुल गांधींनंतर आज मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘युवा संवाद’:नागपुरात हजारो युवकांशी साधणार संवाद, ढोल-ताशांच्या वादनाचा जागतिक विक्रम घडणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन-४ युवा अभियानाचा’ आज रेशीमबाग मैदानावर फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. सविस्तर वाचा राहुल म्हणाले- महिलांविरोधात 3 प्रकारे हिंसा:पहिली- गर्भातच हत्या, दुसरी- शारीरिक अत्याचार, तिसरी- आर्थिक निर्बंध शनिवारी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, “देशातील मुली स्वतंत्र असणे महत्त्वाचे आहे. तुमचे तुमच्या वडिलांशी, पतीशी आणि मुलाशी नाते असते, पण तुमची ओळख त्यांच्यासोबत नाही.” ते म्हणाले की, मनुस्मृती सांगते की मुलगी ही तिच्या वडिलांची, पतीची आणि मुलांची मालमत्ता आहे. हे लज्जास्पद आहे. महिला स्वतंत्र असल्या पाहिजेत. त्या कोणावरही अवलंबून नाहीत. राहुल गांधी म्हणाले, “महिलांवरील हिंसाचाराचे तीन प्रकार आहेत. पहिला, जन्मावेळी हत्या, दुसरा, शारीरिक छळ आणि तिसरा, आर्थिक निर्बंध.” या कार्यक्रमासाठी केवळ विद्यार्थिनींना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ‘राहुल-राहुल’च्या घोषणा दिल्या. सविस्तर वाचा
Source link
भाजप म्हणजेच पेड इव्हेंट:राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार, फडणवीसांच्या नागपुरातील कार्यक्रमावरही निशाणा