![]()
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी अमरावती येथे मतदार यादीच्या विशेष सूक्ष्म पुनरिक्षणाचा (एसआयआर) आढावा घेतला. या आढावा बैठकीत ‘एसआयआर’ला पुन्हा एकदा आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रारूप मतदार यादी आता २४ ऐवजी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त नयना गुंडे, पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यात सध्या नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जुन्या यादीतील मृत आणि दुबार मतदारांची नावे वगळणे तसेच स्थलांतरित मतदारांची नावे त्यांच्या संबंधित मतदारसंघात समाविष्ट करणे सुरू आहे. हे काम यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु काही जिल्ह्यांमध्ये कामात दिरंगाई झाल्याने ‘एसआयआर’ला मुदतवाढ देण्यात आली. सर्व मतदारांच्या नावांचे डिजिटायझेशन झाले असले तरी, मतदान केंद्रांचे पुनर्गठन न झाल्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. चोक्कलिंगम यांनी पाचही जिल्ह्यांच्या कामाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. ही बैठक सुमारे अडीच तास चालली. मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी ३१ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांचे पुनर्गठन कसे करावे आणि त्यानंतरच्या एका महिन्यात प्रारूप यादीवर प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतींची सोडवणूक कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. नागपूर विभागाची बैठक आटोपून ते दुपारी ४ वाजता अमरावतीत पोहोचले आणि बैठक संपल्यानंतर रात्री उशिरा रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार, २५ ऑगस्ट रोजी ते पुणे व कोकण विभागाची, तर २७ ऑगस्ट रोजी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अमरावती जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात ‘एसआयआर’चे काम समाधानकारकरित्या पूर्ण झाले आहे. जुन्या यादीतील सुमारे ८६ टक्के नावे नवीन यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ नावांपैकी राहिलेल्या ३ लाख ५३ हजार ६३ नावांपैकी सुमारे एक लाख नागरिकांचे निधन झाले आहे. समाविष्ट करण्यात आलेल्या नावांची आकडेवारी राज्यात सर्वाधिक असल्याने अमरावती जिल्हा प्रशासनाला कौतुकाची थाप मिळाली.
Source link
चोक्कलिंगम यांनी अमरावतीत घेतला ‘एसआयआर’चा आढावा:मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाला मुदतवाढ, प्रारूप यादी 31 ऑगस्टला