Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:ऑगस्ट महिन्यात 55% पावसाची तूट; 6.37 लाख हेक्टरवरील पिके संकटात




जिल्ह्यात सरकारी कागदावर पावसाची स्थिती समाधानकारक दिसत असली तरी जूनपासून १८ ऑगस्टपर्यंत अपेक्षित ३६६.७० मिमीच्या तुलनेत प्रत्यक्ष ३८३.७० मिमी म्हणजे १०४.६४ टक्के पाऊस झाला आहे. मात्र या आकड्याच्या पोटात ऑगस्टची मोठी तूट दडली आहे. ऑगस्टची सरासरी ८९.३० मिमी असताना आतापर्यंत केवळ ४०.५० मिमी म्हणजे ४५.४० टक्के पाऊस झाला. अर्थात चालू महिन्यात पावसाची तूट तब्बल ५४.६० टक्के आहे. जून-जुलैच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर पैसा खर्च केला. पिके उगवली, शिवार हिरवे झाले; मात्र ऐन वाढीच्या टप्प्यावर ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली. जिल्ह्यात ऊस वगळता ६ लाख ८१ हजार ९०४ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी ६ लाख ३६ हजार ९१५ हेक्टरवर म्हणजे ९३ टक्के पेरणी झाली आहे. त्यामुळे पावसाचा खंड आणखी लांबला तर प्रश्न केवळ रोपांचा नाही; मातीत गुंतलेल्या शेतकऱ्याच्या हंगामाचा आहे. जिल्ह्यात २ लाख ८३ हजार ८३ हेक्टरवर कापूस, २ लाख ११ हजार ९६३ हेक्टरवर मका, ६२ हजार १४६ हेक्टरवर तूर आणि ४५ हजार ७४८ हेक्टरवर सोयाबीन पेरले आहे. या पिकांसाठी खर्च आधीच केला आहे. त्यामुळे पाऊस आता पिकांची गरज राहिलेला नाही; तो हंगामभराच्या गुंतवणुकीशी जोडला गेला आहे. पावसाचा खंड वाढल्याने काही भागांत पिकांवर ताण जाणवू लागला आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगाात ९३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी आहे. ऑगस्टमध्ये संभाजीनगर तालुक्यात सरासरीच्या अवघा २५.९० टक्के, खुलताबाद २६.२०, फुलंब्रीत ३१.७० , तर पैठण ३२.३० टक्के पाऊस झाला आहे.सोयगाव ८१.४०, कन्नडमध्ये ८०.६०, वैजापूरमध्ये ५५.३० आणि सिल्लोडमध्ये ५५.२० टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. यंदा शेतकऱ्यांनी तुरीवर आशा ठेवली. जिल्ह्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार ११० हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी ६२ हजार १४६ हेक्टरवर झाली. म्हणजे पेरणी थेट २०० टक्क्यांवर पोहोचली. मात्र काही शिवारांत आता याच तुरीचे रोप जगविण्यासाठी घरातील महिला-पुरुष हंड्या-बादल्या घेऊन शेतात उतरत आहेत. जिल्ह्यात जून-जुलैची सरासरी २७७.४० मिमी असताना प्रत्यक्ष ३४३.२० मिमी म्हणजे १२३.७२ टक्के पाऊस झाला. याच जादा पावसामुळे जूनपासूनची एकत्रित टक्केवारी आजही १०४.६४ टक्के दिसत आहे. मात्र ऑगस्टमध्ये निम्माही पाऊस झालेला नाही. आनंद गणजेवार, कृषी अधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *