![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिल्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हेही जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून संवादाचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे. आज अंतरवालीत महत्त्वाची बैठक मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे आज सोमवारी दुपारी दोन वाजता अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांनी सरकारमधील नेत्यांवर, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट टीका केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे दोन मंत्री थेट अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा करणार असल्याने या भेटीत काय तोडगा निघतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अब्दुल सत्तारांची कालच जरांगेंशी भेट याआधी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी रविवारी अचानक अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही योद्धा आहात. काही चुका झाल्या असतील किंवा गैरसमज झाला असेल तर चर्चा करून तो दूर करता येईल. त्यासाठी आधी चर्चा करावी लागेल,” अशा शब्दांत सत्तार यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी समाजाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही संजय शिरसाट आणि शिंदेसाहेबांवर जिवापाड प्रेम केले. मात्र मैत्रीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे. मैत्रीसाठी समाजाचे नुकसान होऊ देणार नाही,” अशी भूमिका जरांगे यांनी सत्तार यांच्यासमोर मांडल्याचे सांगण्यात आले. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर आता उदय सामंत आणि शंभूराज देसाई हेही जरांगे यांची भेट घेणार असल्याने सरकारकडून संवादाचे प्रयत्न वाढल्याचे दिसत आहे. राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाडही चर्चेसाठी जाणार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगर येथे येऊन त्यानंतर अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे सरकार आणि जरांगे यांच्यातील संवादाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला शिंदे गटाचे मंत्री आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते अशा दोन्ही बाजूंनी जरांगेंशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे आक्रमक ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयानंतर मनोज जरांगे यांची भूमिका अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली असून, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे. जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने सरकारसमोर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी १ सप्टेंबरला मुंबईत मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्मण हाके यांनी सरकारवरही टीका केली असून, ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनोज जरांगे यांच्यावरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. विशेष म्हणजे, मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने ओबीसी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे हाके यांनी सांगितले. सरकारने प्रथमच ओबीसी समाजाशी संवाद साधण्याची भूमिका घेतल्याचा दावाही त्यांनी केला. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची शक्यता? मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच ओबीसी संघटनांनी 1 सप्टेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही मुद्द्यांवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे जरांगे यांचे आंदोलन, तर दुसरीकडे ओबीसी संघटनांचा मोर्चा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारसमोर दोन्ही समाजांच्या मागण्यांमध्ये समतोल साधण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठीही सरकारला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. आंदोलनाआधीच सरकारची ‘डॅमेज कंट्रोल’ मोहीम मनोज जरांगे यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या भेटी वाढल्याने या घडामोडीकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे. अब्दुल सत्तार यांच्यानंतर उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांची भेट, तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या संभाव्य चर्चेमुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. मात्र, जरांगे यांनी यापूर्वीही सरकारसोबत चर्चा केल्यानंतर आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सरकारकडून नेमकी कोणती भूमिका मांडली जाते आणि जरांगे त्यावर काय उत्तर देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी जरांगे यांची मनधरणी करण्यात सरकारला यश येते का, की जरांगे आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहतात, याचे उत्तर आजच्या अंतरवालीतील बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हेही वाचा… अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग: 3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सत्ताधाऱ्यांवर जरांगेंची नाराजी, सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न:अंतरवालीत आज महत्त्वाची बैठक; शिंदे गटाचे मंत्री, भाजप नेतेही भेटीला