Headlines

औंढा नागनाथमध्ये 8तासात 40 हजार भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन:गर्दीमुळे अभिषेक पुजा अन् विशेष पास दर्शन बंद




देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी ता. 24 रोजी आठ तासात तब्बल 40 हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने नागनाथ मंदिर परिसर दणाणून गेला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील भावकांचा ओघ कायम आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. रविवारपासूनच ता. 23 महाराष्ट्राबाहेरील भाविक औंढा नागनाथ येथे दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेशासह पंजाब मधील भाविकांचाही समावेश आहे. मध्यरात्री साडेबारा वाजता वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. श्रीधर घुगे, नायब तहसीलदार प्रविण ऋषी यांच्या हस्ते नागनाथाची महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक वैजनाथ पवार, सुरेंद्र डफळ यांची उपस्थिती होती. दरम्यान, महापुजेनंतर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनसाठी खुले करण्यात आले. मध्यरात्रीपासून भाविकांनी मंदिराच्या पश्‍चिमद्वारापासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे दर्शन सुरु झाल्यानंतर पश्‍चिमद्वारापासून मंदिरातील गर्भगृहापर्यंत दर्शन घेण्यासाठी चार तासाचा कालावधी लागत आहे. मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अभिषेक पुजा पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच रांगेतील गर्दी पाहूनच विशेष पास दर्शनाचा निर्णय घेण्यात आला. विशेष पास दर्शन रांगेतही गर्दी झाल्याने पासेस देण्यासाठी एक ते दोन तासांचा खंड देण्यात आला. औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दानशुरांकडून सुमारे 10 क्विंटल साबुदाना खिचडी वाटप केली जात आहे. तर दर्शन रांगेतील भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत 40 हजार पेक्षा अधिक भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतल्याचा अंदाज संस्थान प्रशासनाने व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *