![]()
सिंहगड रस्त्यावर पीएमपी बसमधून खाली पडल्याने एका 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मागून येणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली सापडल्याने तिला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी (24 ऑगस्ट) सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ब्रह्मा हॉटेलसमोरील वूड प्लाझा दुकानाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन बळवंत खड्डा (वय 25, रा. कृष्णा हॉस्टेल, डीआयएटी कॅम्पस, गिरीनगर, खडकवासला, पुणे) या खानापूर ते स्वारगेट मार्गावरील पीएमपी बस क्रमांक एमएच 12 आरएन 9074 मधून प्रवास करत होत्या. सकाळी 9 वाजून 46 मिनिटांनी सिंहगड रस्त्यावर ब्रह्मा हॉटेलच्या विरुद्ध बाजूस, स्वारगेटकडे जाणाऱ्या मार्गावर त्या बसच्या पुढील दरवाजातून खाली पडल्या. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्या खाली पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या स्कूल बस क्रमांक एमएच 12 यूएम 6339 च्या चाकाखाली त्या सापडल्या. या अपघातात कांचन गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने जगताप रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बसचालकांची चौकशी केली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, बसमध्ये किती गर्दी होती आणि पीएमपी बसमधून तरुणी खाली कशा पडल्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिंहगड रस्त्यावर सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि वाहनांची गर्दी असते. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षितता, बसमधील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Source link
पुण्यात सिंहगड रस्त्यावर अपघात:पीएमपीमधून खाली फेकली गेलेली तरुणी स्कूल बसच्या चाकाखाली चिरडली