![]()
पुण्यात डॉ. स्वाती दैठणकर यांच्या ‘नर्तन कीर्तनम्’ या नृत्यप्रस्तुतीला रसिकांनी भरभरून दाद दिली. कर्वे रस्त्यावरील बालशिक्षण मंदिर सभागृहात रविवारी हे सादरीकरण झाले. या कार्यक्रमातून वैष्णव परंपरेतील संतकवी श्री रूप गोस्वामी यांच्या भक्तीरसपूर्ण आणि तत्त्वज्ञानपर रचना भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरू आणि नृत्यसंरचनाकार डॉ. स्वाती दैठणकर यांनी आपल्या शिष्यांसह ही प्रस्तुती साकारली. अमेरिकास्थित श्री राधा माधव फाईन आर्ट्स कल्चरल सोसायटी आणि नुपूरनाद अकॅडमी यांच्यातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर यांच्यासह प्राजक्ता बापट, राजलक्ष्मी बागडे, गौरी बुर्डे आणि प्रांजली गोरे या शिष्यांचा सादरीकरणात सहभाग होता. ‘नर्तन कीर्तनम्’ ची संहिता, नृत्यसंरचना आणि सादरीकरण डॉ. स्वाती दैठणकर यांचे होते, तर संगीत डॉ. धनंजय दैठणकर यांनी दिले होते. संगीतरचना प्रामुख्याने कर्नाटक संगीतावर आधारित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. दैठणकर यांच्या चार शिष्यांनी श्री रूप गोस्वामी यांच्या रचनांवर आधारित गजेंद्रमोक्षकथा, गोवर्धनकथा आणि आनंद अष्टकम् या संस्कृत रचनांचा अर्थ विवेचनातून आणि नंतर समूह नृत्यातून उलगडला. यापूर्वी डॉ. दैठणकर यांनी सादर केलेल्या ‘दान केली कौमुदी’ या प्रस्तुतीविषयीचे विवेचनही यावेळी सादर झाले. डॉ. स्वाती दैठणकर यांनी सांगितले की, श्री रूप गोस्वामी हे १६ व्या शतकातील वैष्णव परंपरेतील ज्येष्ठ दार्शनिक, आचार्य आणि संतकवी होते. त्यांच्या ‘स्तवमाला’ आणि ‘उपदेशामृत’ या ग्रंथांतील संस्कृत रचना नृत्यमाध्यमातून सादर करण्यात आल्या. नव्या पिढीला (Gen Z) नृत्यासारख्या आकर्षक माध्यमातून भक्तीची संकल्पना आणि तिचे परमोच्च स्वरूप समजावून सांगण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्वाती आणि धनंजय दैठणकर या कलावंत दांपत्याशी राजलक्ष्मी माने यांनी संवाद साधला. नुपूरनाद संस्थेचा ‘नर्तन कीर्तनम्’ हा १९ वा कला प्रकल्प आहे. डॉ. स्वाती दैठणकर यांनी यावेळी सांगितले की, भरतनाट्यम् शिकणे आणि नृत्य सादर करणे हे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते, जे साकार करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. तसेच, धनंजय यांच्या रूपाने कलागुणांची कदर करणारा जोडीदार मिळाल्याने अनेक प्रकल्पांचे संकल्प आणि प्रस्तुती शक्य झाली.
Source link
डॉ. स्वाती दैठणकर यांचे 'नर्तन कीर्तनम्' सादर:वैष्णव तत्त्वज्ञान भरतनाट्यममधून उलगडले; रसिकांची दाद