![]()
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बस अपघातात होणाऱ्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसाठी प्रथमच भरपाई देण्याचे धोरण निश्चित केले आहे. याशिवाय, अपघातात मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना मिळणारी आर्थिक मदत दोन लाखांवरून तीन लाख रुपये, तर जखमींसाठीची मदत पन्नास हजारांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या बसना तृतीय पक्ष दायित्व विमा उतरविण्यातून शासनाने सूट दिली होती. त्यामुळे बस अपघातात व्यक्तीचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास आर्थिक मदतीसाठी २०१५ मध्ये संचालक मंडळाने धोरण निश्चित केले होते. मात्र, दुकान, घर, वाहन किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत कोणतेही निश्चित धोरण नव्हते, ज्यामुळे प्रशासकीय अडचणी येत होत्या. पुणे महापालिकेच्या सभागृहात झालेल्या पीएमपीएमएलच्या विशेष सभेत नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. या बैठकीला पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापालिका आयुक्त आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर, पीएमपीएमएलने आता मालमत्ता नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली आहे. अपघातानंतर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन बाह्य संस्था किंवा तज्ज्ञांकडून केले जाईल. तृतीय पक्ष दायित्व विमा कंपन्यांच्या धर्तीवर मूल्यांकन करणारी संस्था किंवा व्यक्ती नियुक्त करण्यात आली आहे. नुकसानभरपाईची रक्कम देताना संबंधित मालमत्ताधारकाकडून प्रतिज्ञापत्रही घेण्यात येणार आहे. दरम्यान, अपघातग्रस्ताने मोटार वाहन कायद्यानुसार स्वतंत्र नुकसानभरपाईचा दावा दाखल केल्यास, पीएमपीएमएलने दिलेली रक्कम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. न्यायालयाने निश्चित केलेल्या अंतिम भरपाईतून पीएमपीएमएलकडून आधी दिलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अदा केली जाईल. हे धोरण पीएमपीएमएलच्या बससेवेसाठी कार्यरत असलेल्या खासगी बस पुरवठादारांनाही लागू राहील.
Source link
पीएमपीएमएल बस अपघातात मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई मिळणार:मृत्यू झाल्यास 3 लाख, जखमींना 1 लाख, नवीन धोरण लागू