Headlines

तांडा वस्ती निविदा 15 दिवसांपासून रखडल्या:सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार आंदोलनाच्या तयारीत




नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती क्षेत्रातील तांडा वस्ती विकास योजनेअंतर्गत सुमारे ३३ लाख रुपयांच्या विकास कामांसाठीची निविदा प्रक्रिया गेल्या १५ दिवसांपासून गटविकास अधिकारी कार्यालयात रखडली आहे. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्यामार्फत ही ३३ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, निविदा सादर होऊन १५ दिवस उलटले तरी ती अद्याप उघडण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या निविदेत तीव्र स्पर्धा झाल्यामुळे काम कमी दराने दिले जाईल, हे लक्षात आले आहे. त्यामुळे निविदा ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. टेंडर मॅनेज होत नसल्यानेच निविदा उघडण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे. यामुळे निविदा वेळेत न उघडल्यास मोठा आर्थिक घोटाळा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार कमी दरात काम करण्यास तयार असतानाही त्यांना संधी नाकारली जात असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. या प्रकरणी काही कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांची भेट घेऊन लेखी तक्रारही दिली आहे. कंत्राटदारांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, येत्या दोन दिवसांत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण न झाल्यास गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी कंत्राटदारांसह नागरिकांमधून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *