Headlines

चांदूर रेल्वे स्टेशनच्या सुविधांसाठी ‘रेल रोको’ कृती समिती आक्रमक:खासदार, आमदारांना निवेदन; प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी




चांदूर रेल्वे स्टेशनवर मूलभूत सुविधा आणि प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी ‘रेल रोको कृती समिती’ आक्रमक झाली आहे. समितीने खासदार अमर काळे आणि आमदार प्रताप अडसड यांना निवेदन सादर केले असून, स्टेशनच्या दुरुस्तीसह प्रवाशांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. नागपूर–भुसावळ रेल्वे मार्गावरील चांदूर रेल्वे स्टेशनवर शहर आणि परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व कर्मचारी प्रवासासाठी अवलंबून आहेत. मात्र, येथे अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. समितीने निवेदनातून स्टेशनची इमारत व परिसरातील दुरुस्ती, मूलभूत सुविधांची उपलब्धता, स्वच्छ व सुरक्षित वेटिंग हॉल, दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी प्रकाश व्यवस्था, आधुनिक कोच इंडिकेटर आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची मागणी केली आहे. याशिवाय, 11203/11204 नागपूर–मडगाव एक्सप्रेस आणि 12405/12406 भुसावळ–हजरत निजामुद्दीन गोंडवाना सुपरफास्ट एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना चांदूर रेल्वे स्टेशनवर नियमित थांबा देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफची नियमित व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे हे महत्त्वाचे स्टेशन असूनही येथे सुविधांचा अभाव असल्याने समितीने सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याची, निधी उपलब्ध करून देण्याची आणि कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची विनंती केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांच्यासह मेहमूद हुसेन, विनोद जोशी, सतीश चौधरी, अजय हजारे, अमोल देशमुख, विनोद लहाने, मंगेश डाफ, हर्षल वाघ, सुमेध सरदार आदी उपस्थित होते. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे. तसेच, शिवाजी महाराज नगर परिसरातील भूमिगत मार्गाचे काम दीर्घकाळापासून अपूर्ण असून, ते तातडीने पूर्ण करण्याची मागणीही समितीने केली आहे. या मागणीचा यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *