![]()
शासकीय कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरीला मुळापासून चाप लावण्यासाठी आता राज्य प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील वादग्रस्त ‘सेवार्थ’ घोटाळा आणि बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे लाटलेल्या शासकीय नोकऱ्यांचा दाखला देत, एवढ्या अथांग प्रशासकीय यंत्रणेवर केवळ मानवी डोळ्यांनी २४ तास नजर ठेवणे अशक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र आणि सामान्य प्रशासन विभागाने संयुक्तपणे विकसित केलेल्या अत्याधुनिक ‘एआय असिस्टंट’ व डिजिटल प्रणालीच्या सादरीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. अवाढव्य बोजाखाली कोलमडणाऱ्या शासकीय यंत्रणेला बाहेर काढण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब आणि मानवी संसाधन सुधारणा आता काळाची गरज बनल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सुट्टीच्या दिवशीही मोबाइलवरून फाइल क्लिअर करावी लागणार शासकीय कामातील लालफितीचा कारभार आणि फायलींचा खोळंबा संपवण्यासाठी ही नवी प्रणाली महत्त्वाची ठरेल. या तंत्रज्ञानामुळे कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होणार असून अधिकाऱ्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य थोडे मर्यादित होईल; मात्र प्रशासकीय कामाची गती आणि उत्पादकता प्रचंड वाढेल. आता सुट्टीचे कारण सांगून तातडीच्या फाइल्स प्रलंबित ठेवता येणार नाहीत. शनिवार असो वा सार्वजनिक सुट्टी, महत्त्वाच्या फाइल्स अधिकाऱ्यांना थेट मोबाइलवरूनच मंजूर कराव्या लागतील. प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचे पद्धतशीर डॉक्युमेंटेशन होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली. तंत्रज्ञानामुळे काय बदलणार? बोगस नोकरभरतीला चाप : यापूर्वी ‘सेवार्थ’ प्रणालीत ५ ते ७ वर्षे जुनी बॅकडेटेड कागदपत्रे जोडून हजारो बोगस शिक्षकांची नियुक्ती दाखवून कोट्यवधींचे पगार लाटण्यात आले. आता डिजी-लॉकर आणि ब्लॉकचेन पडताळणीमुळे मूळ प्रमाणपत्रांची सत्यता थेट तपासली जाईल; परिणामी क्रीडा अथवा शिक्षण विभागातील बनावट नियुक्त्या पूर्णपणे बंद होतील. अनुभवाचा कायमस्वरूपी डेटाबेस : याआधी संकट व्यवस्थापन किंवा महत्त्वाच्या योजनांचा प्रत्यक्ष अनुभव अधिकारी निवृत्त होताच नष्ट व्हायचा. आता ‘इन्स्टिट्युशनल मेमरी’मुळे अशा कार्यपद्धतींचे कायमस्वरूपी डिजिटल डॉक्युमेंटेशन उपलब्ध राहील. तातडीने फाइल मंजुरी : पूर्वी प्रत्यक्ष टेबलावर उपस्थित नसल्याचे कारण देत फाइल्स रखडवून ठेवल्या जायच्या. नव्या एआय असिस्टंट प्रणालीमुळे सुट्टीच्या दिवशीही तातडीच्या फाइल्स मोबाइलवरूनच मंजूर करणे बंधनकारक राहील.
Source link
बोगस नोकरभरती, घोटाळ्यांना बसणार चाप:प्रशासकीय कारभारावर असणार एआयचा कडक पहारा- फडणवीस