![]()
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी विवाहासाठी पोलिस प्रशासनाकडे रजेचा अर्ज सादर केला असून, ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, पोलिस भरतीदरम्यान झालेली त्यांची ओळख पुढे नात्यात बदलली आणि आता दोघींनी एकत्र आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वी दोघींची पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती झाली. प्रशिक्षणानंतर काही काळ त्यांनी पोलिस मुख्यालयात सेवा बजावली. त्यानंतर दोघींची शहरातील एकाच पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली. एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांच्यातील जवळीक वाढली. कालांतराने दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विवाहाला विरोध या प्रकाराची माहिती एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी या नात्याला आणि विवाहाला विरोध केल्याची माहिती आहे. कुटुंबीयांनी विवाह थांबवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, हा दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याने पोलिस प्रशासनाने विवाह रोखण्याऐवजी गरज भासल्यास समुपदेशनाची मदत देण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. दरम्यान, दोघींनी विवाहासाठी पोलिस ठाण्यात अधिकृतपणे रजेचे अर्ज सादर केले आहेत. या अर्जासोबत त्यांनी लग्नपत्रिकाही जोडल्याची माहिती आहे. लिंगबदलाचे उपचार सुरू दोघींपैकी एकीवर लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहिती आहे. यासाठी ती मुंबईतील एका रुग्णालयात गेल्याचे सांगितले जात आहे. विवाह कायदेशीर मानला जाईल का? दोन्ही महिला पोलिस कर्मचारी वैदिक पद्धतीने विवाहाचा सोहळा करू शकतात. मात्र, केवळ विवाह सोहळा पार पडल्याने त्या दोघींना सध्याच्या कायद्यानुसार विवाहित जोडप्याचा वैधानिक दर्जा मिळेलच असे नाही.याचा परिणाम वारसा, पती-पत्नी म्हणून मिळणारे कायदेशीर अधिकार, संयुक्त मालमत्ता, वैवाहिक लाभ, विमा, पेन्शन, वारसाहक्क किंवा इतर वैधानिक सुविधांवर होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात सामाजिक आणि वैयक्तिक निर्णयाबरोबरच त्याचे कायदेशीर परिणामही महत्त्वाचे ठरतात. समलैंगिक विवाहाबाबत कायदा काय सांगतो? भारतामध्ये प्रौढ व्यक्तींमधील परस्पर संमतीने असलेले समलैंगिक संबंध गुन्हा नाहीत. मात्र, समलैंगिक विवाहाला सध्या कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२३ मध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी कायदा करणे हे संसदेच्या अखत्यारीतील असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी विवाहाचा निर्णय घेतल्याने त्यांच्या वैयक्तिक निर्णयासोबतच लिंग ओळख आणि सेवा नोंदीतील बदलाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. याआधीही पोलिस दलात लिंगबदलाचा प्रकार! पिंपरी-चिंचवड पोलिस दलात यापूर्वीही एका महिला कर्मचाऱ्याच्या लिंगबदलाचा विषय समोर आला होता. बीड येथून जिल्हा बदलीने पिंपरी-चिंचवड पोलिस दलात आलेल्या या कर्मचाऱ्याने शासनाची परवानगी घेऊन लिंगबदलाची शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. शस्त्रक्रियेनंतर आपल्या अधिकृत सेवा नोंदींमध्ये लिंग ओळखीनुसार बदल करून पुरुष पोलिस कर्मचारी म्हणून नोंद करण्यात यावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्याने शासनाकडे केली. मात्र, या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले जाते.पोलिस भरतीच्या वेळी संबंधित कर्मचारी महिला उमेदवार म्हणून सेवेत दाखल झाली होती. त्यावेळी मिळालेले आरक्षण आणि इतर सवलती लक्षात घेता, लिंगबदलानंतर सेवा नोंदीत बदल केल्यास त्याचा सेवाशर्तींवर नेमका काय परिणाम होईल, हा प्रशासकीय प्रश्नही यामध्ये आहे.यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात सध्या दोन वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहेत. एका बाजूला दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी विवाहासाठी रजेचा अर्ज केला आहे. तर दुसऱ्या बाजूला लिंगबदलानंतर अधिकृत सेवा नोंदीत लिंग ओळख बदलण्याची मागणी समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये वैयक्तिक निर्णयासोबतच सेवा नियम आणि प्रशासकीय प्रक्रियेचे प्रश्नही जोडले गेले आहेत. त्यामुळे संबंधित विभाग आणि शासन या प्रकरणांकडे कोणत्या भूमिकेतून पाहते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगर प्रकरण: आयफोनचा वाद नव्हे, कौटुंबिक तणावातून संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर प्रकरणातील चांदगुडे परिवाराचा दुर्दैवी अंत झाला. यात कुणाल व मुरलीधर यांचा पडतानाचा स्पष्ट व्हिडिओ यापूर्वीच समोर आला होता, तर काही वेळाने संगीता खाली पडल्याचे समोर आले होते. मात्र तसा पुरावा समोर आला नव्हता. आता समाज माध्यमांवर नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात संगीता ह्या खाली पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्या खाली बघताना घसरल्या की त्यांनी उडी घेतली ही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुलगा कुणालने आयफोनसाठी आत्महत्या केल्याची चर्चा सुरुवातीला रंगली होती; मात्र, कुणालची मावशी पल्लवी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, ही घटना मोबाईल फोनशी संबंधित नव्हती. लोकांनी अशा अफवा पसरवू नयेत. मूळ परिस्थितीबाबत लोकांना कोणतीही खरी माहिती नाही. सविस्तर वाचा..
Source link
पुण्यात दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांचं लग्न:समलैंगिक विवाहासाठी लग्नाच्या पत्रिकेसह प्रशासनाकडे केला रजेचा अर्ज, एकीवर लिंगबदलाचे उपचार सुरू