![]()
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्ते अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत का, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्याने पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाच्या निधीचा वापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यापूर्वीही निधी वळवला लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वीही सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवण्यात आली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये, तर जून 2025 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यांच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपये वळवण्यात आले होते. तसेच ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 दरम्यान जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांच्या वितरणासाठी प्रत्येकी 410.30 कोटी रुपये वळवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता पुन्हा 344.74 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार भागवण्यासाठी मागील वर्षापासून सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या विभागांच्या निधीतून महिला व बाल विकास विभागाकडे रक्कम वळवण्यात आली होती. त्यामुळे वारंवार निधी वळवला जात असल्याने सामाजिक न्याय विभागाच्या इतर कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांना निधी मिळण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मागासवर्गीय, वंचित आणि गरजू घटकांसाठीच्या योजनांसाठी निधीची उपलब्धता कमी होऊ शकते. एका योजनेचा खर्च भागवण्यासाठी दुसऱ्या विभागाच्या तरतुदीतून वारंवार निधी वळवला जात असल्याने या निर्णयावर विरोधकांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ₹3,000 मिळणार? गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही रक्षाबंधनाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्रितपणे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, लाभार्थी महिलांच्या खात्यात नेमके 1,500 रुपये जमा होणार की 3,000 रुपये, याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. हेही वाचा.. फायर ऑडिटकडे पीडब्ल्यूडीच्या 37 दिवस दुर्लक्षाने तीन बाळांचा बळी:अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटाने आग येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे ३.३० वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग भडकली. या घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. ३६ बालकांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्यातील ५ जणांना दुखापत झाल्याने अन्य रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत २१ ऑगस्टला संपली. तत्पूर्वीच रुग्णालय प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.सविस्तर वाचा..
Source link
लाडक्या बहिणींसाठी खूशखबर!:रक्षाबंधनाच्या आधी हप्ता देण्याची तयारी; ३४४ कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग