![]()
पिंपरी-चिंचवड शहरात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे एका तक्रारदाराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाच्या खर्चावरून प्रश्न विचारणाऱ्या दिलीप मारुतीराव तनपुरे यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, हा हल्ला भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सांगवी ते बोपोडी परिसराला जोडण्यासाठी ३२ कोटी रुपये खर्चून पूल उभारला आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या केवळ सुशोभीकरणासाठी तब्बल १९ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सांगवी परिसरातील ‘काँग्रेच्युलेशन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिलीप तनपुरे यांनी या खर्चाबाबत आणि कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले होते. भररस्त्यात गाठून लोखंडी रॉडने हल्ला भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणेच दिलीप तनपुरे यांच्या जीवावर बेतले. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दिलीप तनपुरे हे आपल्या दुचाकीवरून माकन चौक परिसरातून जात होते. यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवले. काही समजण्यापूर्वीच त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तनपुरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॉट्सअॅपवर दिला होता इशारा तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हल्ल्याच्या काही वेळ आधी तनपुरे यांना व्हॉट्सअॅपवर एक धमकीवजा पोस्ट पाठवण्यात आली होती. “तुम्ही विरोध करा, आम्ही विरोध केला तर सहन करा,” असा मजकूर या पोस्टमध्ये होता. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून प्रश्न विचारणे सुरूच ठेवल्याने हा हल्ला झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोन अटकेत, तीन फरार पीडित दिलीप तनपुरे यांनी हल्लेखोर हे स्थानिक भाजप नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवून दोघांना अटक केली आहे. अभिषेक नारायण शेगडे आणि अंकीतकुमार उर्फ कल्लू राजेश मोर्या अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. तर ओम गणपत ताकवणे, ओम आणि नैतिक हे संशयीत फरात असून, पोलिस या तिघांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
Source link
तुम्ही विरोध करा, मग आम्ही विरोध केल्यास सहन करा:भ्रष्टाचाराबद्दल जाब विचारल्याने एकावर जीवघेणा हल्ला; भाजप कार्यकर्त्यांवर संशयाची सुई