![]()
मित्रांसोबत सुरू असलेल्या मद्याच्या मैफलीत झालेला किरकोळ वाद आणि त्यातून उफाळलेल्या रागातून एका मित्राची जात्याने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. शुक्रवारी (दि. 9) सकाळी द्वारका परिसरातील हॉटेल कोर्टयार्डलगतच्या वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल पगारे (वय 38, रा. मुंदडा बाईक शॉपमागे, द्वारका) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते खासगी वाहनचालक म्हणून काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास विठ्ठल पगारे हे काही मित्रांसोबत घरात मद्यप्राशन करत होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी घरात असलेल्या धान्य दळण्याच्या दगडी जात्याने पगारे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. रात्रभर मदतीविना पडून, रुग्णालयात मृत घोषित हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पगारे यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे ते रात्रभर घरातच मदतीविना पडून होते. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा भाचा निलेश भामरे घरात गेला असता, पगारे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने पगारे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबई नाका पोलिसांची तातडीने कारवाई घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात मद्यप्राशनादरम्यान झालेल्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच दोन ते तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलिस करत आहेत.
Source link
नाशिकमध्ये मद्याच्या मैफलीत मित्राची जात्याने ठेचून हत्या!:किरकोळ वादातून डोक्यावर केले वार; संशयित पोलिसांच्या ताब्यात