Headlines

मार्च-एप्रिलपर्यंत मोदी सरकार शेवटचा श्वास घेईल!:पोलिसांनो, सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नका, दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यासाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी – संजय राऊत




“देशभरात पेटलेला जनक्षोभ आणि जनतेचे हे उफाळलेले बंड आता दडपणे कोणालाही शक्य नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जुलमी सरकारच्या पतनाची उलटी गिनती सुरू झाली आहे. लिहून ठेवा, पुढील सहा महिन्यांत म्हणजेच मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत मोदी सरकार आपला शेवटचा श्वास घेईल आणि देशात निवडणुका होईपर्यंत सर्व पक्षांचे मिळून एक पर्यायी ‘राष्ट्रीय सरकार’ स्थापन होईल,” असा खळबळजनक राजकीय दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी दिल्लीतील इंडिया आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाची कथित मनमानी, पोलिसांकडून आंदोलकांची होणारी धरपकड, पुण्यातील एमपीएससी आंदोलन आणि देशातील राजकीय स्थितीवर नेहमीच्या आक्रमक आणि रोखठोक शैलीत चौफेर हल्ला चढवला. व्यापाऱ्यांचे सरकार घाबरट; तरुणांना कॉक्रोच-मच्छर म्हणणाऱ्यांना जनतेने दारात कुलूप लावायला लावले! केंद्र सरकारच्या भूमिकेची चिरफाड करताना संजय राऊत म्हणाले, “व्यापाऱ्यांचे सरकार हे नेहमीच घाबरट असते. हे लोक खरे राज्यकर्ते नसून व्यापारी आहेत. एखादा खंबीर हृदयाचा नेता असता, तर तो मैदानात उतरून जनतेच्या मागण्या समजून घेता. मात्र, हे सरकार स्वतःच्या दाराला आतून कुलूप लावून भूमिगत झाले आहे.” संविधानिक पदांवरील व्यक्तींची हीन मानसिकता “विरोधी पक्ष आणि देशातील तरुण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असताना त्यांना ‘कॉक्रोच’, ‘मच्छर’ आणि ‘माशी’ म्हणून हिणवले जाते. पण एका मच्छरने संपूर्ण सरकारला हतबल बनवून टाकले आहे. माशी मारण्यासाठी थेट हातोडा उगारणारी ही कोणती मानसिकता आहे? तरुणांना आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या विरोधकांना थेट दहशतवादी आणि देशद्रोही ठरवले जात आहे.” ब्रिटिशांच्या ‘रौलट ॲक्ट’ची पुनरावृत्ती “ब्रिटिशांनी 1919च्या काळात ज्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आंदोलने चिरडण्यासाठी काळा ‘रौलट ॲक्ट’ आणला होता, तोच जुलमी फॉर्म्युला आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशात राबवत आहेत. मात्र, हा इतिहास विसरू नका; इंग्रजांप्रमाणेच या सरकारचाही अंत निश्चित आहे.” जयप्रकाश नारायण आणि चरणसिंगांप्रमाणे आवाहन करतो- पोलिसांनो, बेकायदेशीर आदेश पाळू नका! आंदोलनकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईवरून त्यांनी पोलिसांना थेट आवाहन केले. “माझे हे विधान कदाचित सत्ताधाऱ्यांना राष्ट्रविरोधी वाटेल; परंतु आणीबाणीच्या काळात लोकनायक जयप्रकाश नारायण आणि चौधरी चरणसिंग यांनीही पोलिसांना हेच आवाहन केले होते. जेव्हा सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून विरोधकांचे दमन करतात, तेव्हा पोलिसांचे कर्तव्य संविधानाचे रक्षण करणे असते. त्यामुळे मी पुन्हा बजावतो की पोलिसांनी सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत. सामान्य तरुणांना आणि आंदोलकांना नोटिसा पाठवून ताब्यात घेण्याच्या या बेकायदेशीर कृत्यात पोलिसांनाही स्वतःहून कोणताही रस उरलेला नाही, हे स्पष्ट दिसते आहे.” मोदी-शहा, फडणवीस-शिंदे सत्तेवर असणे हाच व्होटचोरीचा सर्वात मोठा पुरावा! राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. “राष्ट्रपतींनी राहुल गांधींना विचारले की व्होटचोरीचे काय पुरावे आहेत? यावर आमचे उत्तर स्पष्ट आहे—नरेंद्र मोदी, अमित शहा, सुवेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सम्राट चौधरी हे सर्व आज सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, हाच देशात 100 टक्के व्होटचोरी झाल्याचा सर्वात मोठा आणि जिवंत पुरावा आहे. जनतेने यांना निवडून दिलेले नाही; तर निवडणूक आयोगाच्या मदतीने राज्यांची सत्ता ताब्यात घेतली गेली आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराचे आणि मतचोरीचे सर्व अधिकृत पुरावे जनतेसमोर आणि राष्ट्रपतींसमोर मांडणार आहेत.” नेहरूंच्या काळाप्रमाणे देशात ‘राष्ट्रीय सरकार’ स्थापन होणार! मोदी सरकार गेल्यानंतर देशात काय होणार? या प्रश्नावर राऊत यांनी ऐतिहासिक दाखला दिला. “1947 मध्ये जेव्हा ब्रिटिशांचे राज्य संपले, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम ‘राष्ट्रीय सरकार’ स्थापन झाले होते. त्या सरकारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह सर्व विचारसरणींचे नेते सहभागी होते. प्रजासत्ताक होईपर्यंत आणि नव्या निवडणुका होईपर्यंत त्या सरकारने देश चालवला.” एप्रिलनंतर मोदी-शहा नसतील “आज जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. पुढील सहा महिन्यांत इतक्या मोठ्या राजकीय उलथापालथी होतील की मोदी आणि शाह दोघेही सत्तेत राहणार नाहीत. अशा परिस्थितीत देशात सर्व पक्षांचे मिळून एक हंगामी पर्यायी राष्ट्रीय सरकार स्थापन होईल, हे माझे स्पष्ट राजकीय भाकीत आहे.” दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यासाठी शिवसेना सज्ज; अटक झाली तरी मागे हटणार नाही! शिवसेनेच्या सहभागावर भूमिका मांडताना ते म्हणाले, “पहिल्या दिवशी संसदेपासून निर्वाचन सदनपर्यंत काढलेल्या मोर्चात शिवसेना राहुल गांधींसोबत आघाडीवर होती. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आम्ही दोन दिवस महाराष्ट्रात होतो; मात्र उद्यापासून दिल्लीतील प्रत्येक आंदोलनात शिवसेना सक्रियपणे सहभागी होईल. आम्हाला कुठेही बोलवा, लाठ्या खाण्याची किंवा अटक होण्याची वेळ आली तरी शिवसेना घाबरणार नाही. 1947चा स्वातंत्र्यलढा ज्या तरुणांनी पाहिला नाही, त्यांच्यासाठी देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ आहे. प्रत्येक सुजाण नागरिकाने यात सहभागी व्हावे.” पुण्यातील MPSC आंदोलन- गुन्हेगारांना मोकळे सोडून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करता? पुण्यात 9 दिवसांपासून सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर त्यांनी गृहखात्याला धारेवर धरले. “राज्यात खून, दरोडे, बलात्कार सुरू आहेत, शेतकरी दुष्काळात होरपळतोय; त्यावर गृहखात्याने लक्ष द्यावे. पुण्यात एमपीएससीमधील घोटाळे आणि पेपरफुटीविरोधात हक्कासाठी बसलेल्या गरीब विद्यार्थ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. त्यांचा गुन्हा काय आहे?” फडणवीसांचे सरकार जनतेचे नाही “आणीबाणीविरोधात लढल्याच्या गप्पा मारणारे देवेंद्र फडणवीस आज मात्र स्वतःच विद्यार्थ्यांचा आवाज दडपत आहेत. हे फडणवीसांचे सरकार लोकमान्य सरकार नसून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मेहरबानीने आलेले सरकार आहे,” असा सडकून आरोप संजय राऊत यांनी शेवटी केला. ——————————————————– हेही वाचा… दिल्लीची छावणी झाली, आंदोलनात दगाफटका होऊ शकतो: प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर गंभीर आरोप दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावरून आणि प्रशासनाकडून होत असलेल्या धरपकडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “शासनालाच या देशात ‘सिव्हिल वॉर’ म्हणजेच यादवी घडवून आणायची आहे,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच, दंगलीसाठी प्रशिक्षण घेतलेले 50 हजार कार्यकर्ते दिल्लीत आणून ठेवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *