![]()
पिंपळगाव निपाणी येथील सचिन किसन वाकचौरे (वय ३६) हत्याकांडातील खरे सूत्रधार गजाआड होत नाहीत, तसेच परिसरातील अवैध दारू विक्री व खाणपट्टे बंद होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे आणि मयत सचिन यांचे बंधू पोपट किसन वाकचौरे यांनी मंगळवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. हत्याकांडातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, गावातील वाढती गुन्हेगारी रोखावी, तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुनीता पोपट वाकचौरे, सेवानिवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक केशवराव चौधरी, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष लालूशेठ गोविंद दळवी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, नातेवाईक व विविध मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला. ग्रामस्थांनी ‘गाव वर्गणीतून दीडपट एक्साईज व रॉयल्टी भरू; मात्र गावात दारू दुकान आणि अवैध खाणपट्टा नको’, अशी भूमिका घेतली आहे. पिंपळगाव निपाणीतील गुन्हेगारी वाढत असूनही पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात जिल्हा अथवा तालुका प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेण्यात न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ‘न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार’, असा निर्धार डी. के. गोर्डे व पोपट वाकचौरे यांनी व्यक्त केला.
Source link
‘न्याय मिळेपर्यंत माघार नाही’; पिंपळगाव निपाणीकरांचा आमरण उपोषणाचा एल्गार:वाकचौरे हत्याकांडातीलसूत्रधारांना अटककरण्याची मागणी