![]()
वसमत तालुक्यातील गिरगाव येथे डायल 112 क्रमांकावर संपर्क साधून सासूचा खून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या पियूष वाघमारे याच्याविरुद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 26) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुंदा पोलिस ठाण्यात डायल 112 कक्ष स्थापन करण्यात आला असून, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी या कक्षात स्वतंत्र पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 25) रात्री 9 च्या सुमारास डायल 112 क्रमांकावर एका व्यक्तीने फोन केला. त्याने आपले नाव पियूष वाघमारे (रा. गिरगाव) असे सांगत, ‘‘माझ्या सासूचा खून झाला असून, तातडीने पोलिसांची मदत हवी आहे,’’ अशी माहिती दिली. खुनाची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली डायल 112 वर कर्तव्यावर असलेले जमादार राजीव जाधव व इतर कर्मचारी अवघ्या 10 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पियूष वाघमारे याच्या घरी जाऊन पाहणी केली. मात्र, तेथे कोणतीही घटना घडल्याचे आढळून आले नाही. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता वाघमारे याची सासू गावात राहतच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी गावातील पोलिस पाटलांना बोलावून पंचनामा केला. या प्रकरणी जमादार राजीव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिसांनी पियूष वाघमारे याच्याविरुद्ध बुधवारी सकाळी गुन्हा दाखल केला. जमादार मन्मथ नरडेले पुढील तपास करीत आहेत.
Source link
112 वर सासूच्या खुनाची खोटी माहिती देणे महागात:जावयाविरुद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल