![]()
हवेली तालुक्यातील आष्टापूर येथील शेतामधील ५५ गुंठे क्षेत्रावरील सुमारे ४० टन ऊस अज्ञात व्यक्तींनी कापून पिकअप वाहनातून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सात महिन्यांच्या या उसाची किंमत ८८ हजार रुपये आहे. याप्रकरणी अनिल नंदकुमार कांबळे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ लक्ष्मण कोतवाल (२९, रा. पवारवाडी, आष्टापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने योगेश पोपट गव्हाणे (२५, रा. रामकृष्ण मंगल कार्यालयामागे, आष्टापूर) याच्या मदतीने मजूर लावून ऊस तोडल्याची कबुली दिली. फिर्यादी कांबळे हे पत्नी शुभांगी यांच्यासह मुंढवा येथे राहतात. त्यांची आई शामाबाई (६४) तसेच भाऊ संजू (४०) आणि संजय (३७) हे आष्टापूर येथे वास्तव्यास आहेत. कांबळे कुटुंबीयांची आष्टापूर परिसरात वडिलोपार्जित शेती असून ते संयुक्तपणे शेती करतात. अष्टापूर येथील गट क्रमांक ८२२ मधील एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी ऊस लागवड केली होती. फिर्यादीने माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी आई आजारी असल्याने दोन्ही भाऊ मुंढवा येथे त्यांच्या घरी आले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी भाऊ संजय हा मुंढवा येथून अष्टापूरमधील शेतावर परतला. त्या वेळी गट क्रमांक ८२२ मधील बहुतांश ऊस कापून नेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी मजूर लावून कापला ऊस पोलिस निरीक्षक संगीता रोकडे यांनी सांगितले की, संबंधित भागांमध्ये सीसीटीव्ही नसल्याचा फायदा शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या दोघांनी घेतला. संबंधित मजूर लावून ऊस तोडणी केली. त्यानंतर हा ऊस हा राहू-यवत परिसरातील गुऱ्हाळाला विक्री केला. या प्रकरणात गुऱ्हाळ चालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल. कांबळे यांच्या शेतामध्ये केवळ उसाचे तुटलेले खुंट कांबळे कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहणी केली असता एक एकर क्षेत्रापैकी केवळ पाच ते सहा गुंठे क्षेत्रावरील ऊस उभा असल्याचे दिसले. उर्वरित सुमारे ५५ गुंठ्यांतील ऊस कापून नेण्यात आला होता. शेतामध्ये उसाचे केवळ तुटलेले खुंट शिल्लक राहिले होते. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी उसाची चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता, २० ऑगस्ट रोजी सकाळी सहापासून २३ ऑगस्ट रोजी दुपारी बारापर्यंतच्या कालावधीत काही व्यक्ती ऊस तोडून तो पिकअप वाहनामध्ये भरून नेत असल्याचे काहींनी पाहिल्याचे समोर आले. मात्र, शेतमालकांच्या परवानगीनेच ऊसतोड सुरू असावी, असा नागरिकांचा समज झाल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ऊस नेणाऱ्या व्यक्तींची ओळख कुणालाही पटली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. कांबळे यांनी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
Source link
शेतात मजूर लावून 55 गुंठ्यांतील 40 टन ऊसच केला लंपास:पुणे जिल्ह्यात आष्टापूरमधील प्रकार, पोलिसांनी केली दोन जणांना अटक