![]()
स्वतःच्या हक्काच्या घरासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या वैजापूर शहरातील कुटुंबांसाठी घरकुल योजनेने नवी आशा निर्माण केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत २४६ लाभार्थ्यांसाठी तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यांना घरकुल मंजुरीपत्रांचेही वितरण करण्यात आले. यामध्ये १५५ लाभार्थ्यांना पहिला, तर ९१ जणांना दुसरा हप्ता देण्यात आला. शहरात यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतून ६०१ घरकुले पूर्ण झाली असून त्यासाठी १५ कोटी ३ लाख ४० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. अर्जांची छाननी, पडताळणी, मंजुरी आणि निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करत नगर परिषदेने योजनेच्या अंमलबजावणीला वेग दिला आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबांच्या हक्काच्या छताचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे.शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष रियाज अकील शेख, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्यासह नगरसेवकांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. मंजुरीपत्र हाती पडताच अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत १५५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी १ कोटी ५५ लाख, तर ९१ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी ९१ लाख रुपये देण्यात येत आहेत. त्यामुळे नव्याने घर उभारणाऱ्या कुटुंबांना बांधकाम सुरू करता येणार असून, दुसरा हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांना पुढील काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत वैजापूर नगर परिषदेकडे ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ४८३ अर्जांची पडताळणी, तर ४४७ अर्जांचे जिओटॅगिंग पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ४०२ घरांना मंजुरी मिळाली असून त्यातील १६९ घरांची कामे सुरू झाली आहेत. ६०१ घरकुलांचे स्वप्न झाले साकार प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात वैजापूर शहरात आतापर्यंत ६०१ कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळाले आहे. त्यासाठी १५ कोटी ३ लाख ४० हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. शहरातील गरजू कुटुंबांना घरकुल योजनेच्या प्रवाहात आणण्यासाठी नगर परिषदेने पाठपुरावा केला आहे.
Source link
वैजापूर शहरामध्ये 246 घरकुलांना 2.46 कोटी रुपये:लाभार्थींना मिळाला दिलासा, 155 लाभार्थींना पहिला, 91 जणांना दुसरा हप्ता