![]()
आदर्श महिला नागरी पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी तातडीने परत मिळाव्यात, या मागणीसाठी त्रस्त ठेवीदारांनी सिल्लोड येथील शिवसेना कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. वैद्यकीय उपचार, आजारपण आणि विविध कौटुंबिक गरजांसाठी पैशांची अत्यंत निकड असल्याने ठेवींची रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनवणी ठेवीदारांनी केली. यावर आमदार सत्तार यांनी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांना तातडीने पत्र लिहून, विशेषतः आजारी व गरजू ठेवीदारांना मानवतेच्या दृष्टिकोनातून काही रक्कम त्वरित देण्याबाबत कार्यवाही करण्याची शिफारस केली. तसेच सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित परत मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृउबा समिती सभापती सतीश ताठे, प्रशांत क्षीरसागर यांच्यासह ठेवीदार अहमद खान, हरिश्चंद्र सपकाळ, संतराम मगर, रामभाऊ मालोदे, देवराव गाडेकर, छायाताई चव्हाण, उज्वलाताई पवार, संगीताताई जाधव उपस्थित होते. ठेवीदारांचा हा संवेदनशील प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासन आमदार सत्तार यांनी दिले.
Source link
अडकलेल्या ठेवींसाठी आमदार सत्तार यांना साकडे:ठेवी परत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही